
त्रिभाषा धोरणातील हिंदी सक्तीला विरोध करण्याच्या पार्श्वभूमीवर 19 वर्षांनंतर उद्धव आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर आले.
मुंबईच्या एनएससीआय डोममध्ये 5 जुलै रोजी एक ऐतिहासिक क्षण घडला. 19 वर्षांनंतर एकमेकांपासून दुरावलेले ठाकरे बंधू, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, पुन्हा एकत्र एका व्यासपीठावर आले. निमित्त होतं, त्रिभाषा धोरणातील हिंदी सक्तीला विरोध करण्याचा आणि मराठी भाषेसाठी एकत्र उभे राहण्याचा. हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा राज्यभर रंगत होती. पण त्याआधीच राज्य सरकारने मागे फिरत त्रिभाषा धोरणातील सक्तीचा निर्णय रद्द केला. तरीही ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा हा ठरला एक शक्तिप्रदर्शन. स्टेजवर एकत्र येताच दोघांनी एकमेकांना मिठी मारून राजकीय व भावनिक एकतेचा संदेश दिला.
महाराष्ट्रातच नव्हे, तर दिल्लीपर्यंत या भेटीकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. त्रिभाषा धोरणाविरोधात केवळ ठाकरे बंधू नव्हे, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. तिसऱ्या भाषेची सक्ती हा मराठी जनतेचा अपमान आहे, असं सांगत त्यांनी पुन्हा एकदा भाजप, काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यावर तीव्र टीका केली. भाजप हा सापनाथ आहे, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे नागनाथ आहेत. हे सगळेच एकाच माळेचे मणी आहेत. नकली मराठी प्रेम दाखवून हे पक्ष जनतेला गंडावत आहेत, असा घणाघात त्यांनी केला.

Vijay Wadettiwar : छत्रपतींच्या अपमानावरून शिवसेनेवर संतापाची लाट
शिक्षक भरतीवरून सवाल
प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जेथे जेथे त्रिभाषा धोरणाविरोधात आंदोलन होईल, तेथे वंचित बहुजन आघाडी सक्रियपणे सहभागी होईल. प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील निर्णयांचाही पाढा वाचला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वंचित बहुजन आघाडीने शिक्षण धोरणाविरोधात सूचना दिल्या होत्या. पण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. शिक्षक भरतीसाठी आंदोलन सुरू असतानाही 24 हजार शिक्षकांची भरती करण्यात आली नाही, अशी आठवण त्यांनी करून दिली. त्याचबरोबर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या कारभारावरही सवाल उपस्थित केला.
सत्तेवर असताना शिवसेनेने किती मराठी माणसांना कंत्राटे दिली, हे उद्धव ठाकरे यांनी सांगावं, असा थेट सवाल त्यांनी केला.ठाकरे बंधूंची एकता ही फक्त एक मंचीय प्रसंग होता की मराठी अस्मितेच्या नव्या लढ्याची सुरुवात? राज्यातील राजकीय वर्तुळात याचीच चर्चा रंगली आहे. एकीकडे सरकार त्रिभाषा धोरणावर माघार घेतं, आणि दुसरीकडे ठाकरे आणि आंबेडकर यांची भुमिका आक्रमक बनते, हे पाहता यापुढील राजकारणात ‘मराठी’ मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येणार हे स्पष्ट होतं. ठाकरे बंधूंच्या मिठीमागे एक नवा राजकीय अर्थ लपलेला आहे का? प्रकाश आंबेडकरांच्या आक्रमक घोषणांमागे एक मोठा आघाडीचा संकेत आहे का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.