
प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून धमकी दिल्याची आणि आपल्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केल्याची कबुली दिली आहे.
गेल्या महिनाभरापासून फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणामधून अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी 25 मार्च रोजी केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यामुळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे कोरटकरविरोधात मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली होती. यानंतर तो फरार झाला होता. अखेर पोलिसांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आली. मात्र अटकेनंतर त्याने पोलिसांसमोर काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
चौकशीदरम्यान प्रशांत कोरटकरने कबुली दिली की, इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन त्यानेच केला होता. इतकंच नव्हे तर, आपल्या मोबाइलमधील सर्व डेटा त्याने स्वतःहून डिलीट केल्याचंही उघड झालं आहे. कोरटकरच्या कबुलीमुळे तपासाला नवं वळण मिळालं आहे. पोलिसांनी कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने मंचरियालहून चेन्नईला जाण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती देखील त्याने चौकशीत दिली.

फॉरेन्सिक तपासणी
प्रशांत कोरटकरला 28 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यादरम्यान त्याच्या आवाजाची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी करण्यात आली आहे. चौकशीत महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. मात्र चौकशीदरम्यान मध्यरात्री अचानक कोरटकरच्या छातीत दुखू लागल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी इतर ठिकाणी हलवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रशांत कोरटकर गेल्या एक महिन्यापासून फरार होता. या काळात त्याने कुठे आश्रय घेतला? त्याला कोणाची मदत मिळाली? याचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. पोलिस दलातील कोण्या अधिकाऱ्याने त्याला पळून जाण्यास मदत केली का, याचाही शोध घेतला जात आहे.
Maharashtra Assembly : संविधान विचारमंथनात फडणवीस नेतृत्वक्षम
तीन दिवसांची कोठडी
सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपी कोरटकरने आपला मोबाइल डेटा डिलीट केला आहे. तसेच, तो तब्बल एक महिना फरार राहिला, याचा तपास करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळेच न्यायालयाने कोरटकरला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य करताना स्पष्ट केले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. कोल्हापूर पोलिसांनी तांत्रिक पुरावे जमा करून प्रशांत कोरटकरला अटक केली आणि, बीएनएसअंतर्गत योग्य ती कारवाई केली जाईल.’ महाराष्ट्रभर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र कोरटकरविरोधात आता कायदेशीर कारवाई कोणत्या दिशेने जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Harshwardhan Sapkal : भाजपाच्या धर्माधी राजकारणामुळे महाराष्ट्र अशांत