
वादग्रस्त वक्तव्यांनंतर फरार झालेला प्रशांत कोरटकर चंद्रपुरात गुप्तपणे मुक्कामी असल्याची माहिती समोर आली आहे. सट्टा व्यावसायिकाच्या मदतीने त्याचा हा प्रवास आणखीनच गूढ बनला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्ये करून चर्चेत आलेला प्रशांत कोरटकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नागपुरातून फरार झाल्यानंतर तो चंद्रपुरात एका हॉटेलात थांबल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा मुक्काम एका सट्टा व्यावसायिकाच्या मदतीने ठरवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यानंतर कोरटकर अटकेच्या भीतीने भूमिगत झाला होता. मात्र, पोलिसांचा तपास सुरू असतानाही तो चंद्रपुरात आला. पोलिसांच्या नजरेआड राहूनही एका विशिष्ट व्यावसायिकाच्या मदतीने थाटात राहत होता. पोलीस मुख्यालयाच्या समोरच हॉटेलमध्ये थांबणे आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला भेटणे, हे अनेक शंका निर्माण करणारे आहे.

Nana Patole : संघर्ष करणाऱ्या घटकांसाठी काँग्रेसचा ठाम पाठिंबा
सुरक्षित आश्रय
प्रशांत कोरटकरच्या चंद्रपूर मुक्कामाबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. एका स्थानिक सट्टा व्यावसायिकाने त्याच्या राहण्याची संपूर्ण व्यवस्था केली होती. त्याच्यासोबत आणखी दोन बुकी होते, जे त्याला मदत करत होते. एवढेच नाही, तर कोरटकरनेच पोलिस आणि बुकी यांच्यातील सेटिंग घडवून आणल्याचीही चर्चा आहे. या हॉटेलचा मालक आणि सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले त्याचे व्यावसायिक संबंध पाहता, कोरटकरने सुरक्षित ठिकाण म्हणून याची निवड केली असावी. त्यामुळेच, फरारी असतानाही तो अत्यंत सहजतेने चंद्रपुरात मुक्काम करू शकला.
अधिकाऱ्यांशी संबंध उघडकीस
कोरटकरच्या या प्रवासात पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही त्याला भेट दिल्याचे बोलले जात आहे. हा अधिकारी स्वतःच्या बदल्यांसाठी कोरटकरकडे गयावया करत होता, असा आरोप आहे. कोरटकर गेल्या काही वर्षांत उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मध्यस्थी करत असल्याची माहिती आधीच चर्चेत आहे.
प्रशांत कोरटकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट होते की, त्याचे राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांसोबत जवळचे संबंध आहेत. त्यामुळेच, त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करूनही अद्याप त्याला अटक का झालेली नाही, हा प्रश्न लोकांच्या मनात आहे.
अटकेवर सस्पेन्स कायम
प्रशांत कोरटकर सरदार पटेल महाविद्यालयात 1999 ते 2003 या काळात तासिका तत्त्वावर जनसंवाद विभागात शिकवत होता. त्यावेळी तो हिंगणघाट येथून रेल्वेने प्रवास करत असे. मात्र, गेल्या काही वर्षांत त्याचा आर्थिक स्तर झपाट्याने वाढला असून, आता तो कोट्यवधींच्या महागड्या गाड्यांमध्ये वावरतो. सध्या कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. मात्र, पोलिसांच्या हालचाली पाहता, त्याला वाचवण्यासाठी यंत्रणा सतत हात जोडून उभी असल्याचे चित्र दिसत आहे. कोरटकरच्या अटकेची मागणी संपूर्ण महाराष्ट्रभर होत असून, समाजातील सर्व स्तरांतील नागरिक त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.