
भंडाऱ्यातील कोरंबा बायपासचे लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे; मात्र काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी या उद्घाटनाला ब्रेक लावत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सध्या त्यांच्या बालेकिल्ल्यांतूनच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. विदर्भात विशेषतः भंडारा जिल्ह्यात रस्त्यांची दुर्दशा, अर्धवट प्रकल्प आणि वाढते अपघात यामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘रस्त्यांचे शिल्पकार’ अशी ओळख असलेल्या गडकरींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या काही प्रकल्पांनीच जनतेचा जीव धोक्यात घालण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप आता काँग्रेसकडून करण्यात येतोय. भंडाऱ्यातील कोरंभी बायपास ओव्हर ब्रिज हे याचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे.
अत्यंत घाईगडबडीत उद्घाटनाच्या तयारीत असलेल्या या बायपासच्या रस्त्यावर नुकत्याच झालेल्या अपघातात चार निष्पाप नागरिकांचा बळी गेला. पावसाच्या पहिल्याच सरीने रस्त्यावर चिमटे पडले, वरची माती वाहून गेली आणि अपूर्ण पुलावर सुरक्षा व्यवस्थेअभावी दुचाकीस्वारांचा ट्रकसोबत अपघात झाला.या गंभीर परिस्थितीत काँग्रेसचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोले यांनी आक्रमक पवित्रा घेत, थेट नितीन गडकरींच्या प्रस्तावित उद्घाटनास अडथळा आणण्याचा इशारा दिला आहे. 5 जुलै रोजी गडकरी साहेब यांचे उद्घाटन होणार आहे. पण जर रस्त्याचे काम दर्जेदार पूर्ण नसेल, तर आम्ही जनतेसोबत रस्त्यावर उतरणार. उद्घाटन होऊ देणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.

Rahul Bondre : ज्ञानाच्या क्षेत्रात सूडबुद्धीचे राजकारण थांबवा
विदर्भात विकासाचा प्रश्न
खासदार पडोळेंनी स्वामी समर्थ कंपनीवर थेट निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. रस्ते आणि ओव्हरब्रिजचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे नमूद केले. पुलाचे भाग उघडे पडत आहेत, अरिवाल लावलेले नाहीत. ट्रकने टाकलेल्या लोखंडी पाट्यांवर नागरिकांचे प्राण जात आहेत. हे थांबवले पाहिजे, असे ते म्हणाले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना केंद्र व राज्य सरकारकडून तात्काळ २० लाखांची मदत द्यावी. अन्यथा संबंधित कंत्राटदार कंपनीवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून भरपाई घेतली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय संबंधित न्हाईन (NHAI) अधिकाऱ्यांवर दुर्लक्षाचा ठपका ठेवत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचेही आवाहन केले.
भविष्यात आणखी जीवितहानी होऊ नये म्हणून या रस्त्याच्या संपूर्ण बांधकामाची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत पडोळे यांनी स्पष्ट केलं, जर सरकारने दुर्लक्ष केले, तर मोठ्या जनआंदोलनाची तयारी ठेवा. गडकरींच्या नावाखाली सुरू झालेल्या अनेक प्रकल्पांनी विदर्भातील जनतेमध्ये आशा निर्माण केली होती, पण प्रत्यक्षात अर्धवट, असुरक्षित आणि दर्जाहीन रस्त्यांनी लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे पडोळेंचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, गडकरी साहेबांच्या हस्ते उद्घाटन करायचं म्हणून जनतेच्या सुरक्षेचा बळी दिला जाऊ शकत नाही. विदर्भात रस्ते म्हणजे विकासाची चक्रे, पण ती चक्र जर अपघाताचे कारण ठरू लागली, तर प्रश्न फक्त तांत्रिक राहणार नाही. तो राजकीय होतो आणि मानवी मूल्यांशी संबंधित होतो. हेच समजावून देण्याचा प्रयत्न खासदार प्रशांत पडोळे यांनी या आंदोलनातून केला आहे.