नागपूरच्या हृदयातून वाहणारी नागनदी आज स्वतःच मदतीसाठी हाक देताना दिसतेय. सफाईच्या नावावर केवळ दिखावा झाल्याने थोडक्याच पावसात नागरिकांच्या घरात पाणी शिरले आणि समस्या उफाळून आली.
नागपूर शहराच्या मध्यभागातून वाहणारी नागनदी ही फक्त एक नदी नाही, तर नागपूरच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे. मात्र आज हीच नागनदी संकट बनून उभी ठाकली आहे. स्वच्छतेच्या नावावर केवळ दिखावा करण्यात येतोय, आणि त्याचा फटका नागपूरकरांना भोगावा लागत आहे. हलक्या पावसातच घरात पाणी घुसत असेल, तर आगामी पावसाळ्यात काय चित्र असेल, याचा विचारच भयभीत करणारा आहे.
नागपूरचे मध्य नागपूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी नाग नदीच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागपूर महानगरपालिकेवर थेट आरोप केला आहे. दटके यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशोक चौक ते जगनाडे चौक आणि वैद्यनाथ चौक ते जगनाडे चौक दरम्यान नागनदीची सफाई करण्यात आलेलीच नाही. परिणामी, नदीत साचलेली गाळ, प्लास्टिक आणि कचऱ्यामुळे पाणी प्रवाह अडथळलेला आहे. त्याचेच दाहक परिणाम बुधवारी पाहायला मिळाले, जेव्हा केवळ थोड्याशा पावसात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले.
केवळ औपचारिकतेसाठी काम केले
नागपूर महानगरपालिका दरवर्षी उन्हाळा सुरु होताच शहरातील नाले व नद्यांची सफाई करतो, असे जाहीर करतो. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे पावसाळ्यात शहरात जलभराव टाळणे. मात्र, यंदाही ही प्रक्रिया केवळ कागदोपत्री आणि फोटोसेशन्सपुरती मर्यादित असल्याचे आक्षेप आमदार दटके यांनी घेतले आहेत. मनपाने केवळ औपचारिकतेसाठी कामे केली, प्रत्यक्षात नागनदीतील गाळ तसेच आहे. नागपूरच्या लोकांचे जीवन पाण्यात घालवण्याचे काम मनपा करत आहे, असा तीव्र शब्दांत आमदार दटके यांनी संताप व्यक्त केला.
Historical Icon : नागपूर रेल्वे स्थानकासाठी रघुजी भोसले नावाची साद
काही दिवसांपूर्वीच आमदार दटके यांनी स्वतः नागनदी स्वच्छतेचे प्रत्यक्ष निरीक्षण केले होते आणि त्यावेळी उपस्थित असलेल्या मनपा अधिकाऱ्यांना कामामध्ये कोणताही उशीर न करता संपूर्णपणे सफाई करण्याचे निर्देश दिले होते. तरीही मनपाची कार्यप्रणाली थंड असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच, नागनदीच्या काठावर अतिक्रमणही वाढले असल्याचे दटके यांनी निदर्शनास आणून दिले. अतिक्रमणांमुळे नैसर्गिक प्रवाह कुंठित झाला असून त्यामुळे पूरस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आमदाराचे खडेबोल
नागनदी ही नागपूरच्या श्वासवहनाची रेखा आहे, तिच्या साफसफाईमध्ये हलगर्जीपणा चालणार नाही, असे ठाम मत दटके यांनी मांडले. नागपूरकरांनी मनपावर विश्वास ठेवून वेळोवेळी निवडून दिले आहे, मात्र आज त्याच नागरिकांना स्वतःच्या घरात पाण्यात उभं राहावं लागतं, ही शरमेची बाब आहे. आमदार दटके यांनी नागनदीची तातडीने आणि संपूर्णपणे सफाई करण्याची मागणी करत मनपाला सजग राहण्याचा इशाराही दिला आहे. या प्रकाराने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, कागदावरील योजना आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यात मोठी दरी आहे.
पावसाळ्याचा हंगाम तोंडावर आला आहे, आणि जर नागनदीची वेळेवर योग्य ती स्वच्छता झाली नाही, तर नागपूरकरांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, हे निश्चित आहे. नागनदीचा श्वास पुन्हा चालू होणार का? की शहराला दर वर्षी पाण्याच्या संकटात डुबकी घ्यावी लागणार? याचे उत्तर येणाऱ्या काळात ठरेल. पण तोपर्यंत प्रशासनाला झोपेतून जागं करणं गरजेचं आहे.