शासनाच्या जमिनीवर वर्षानुवर्षं राहणाऱ्यांना अखेर हक्काचा श्वास घेता येणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूरात निवासी पट्टे वाटपाची ऐतिहासिक मोहीम गती घेतेय.
बल्लारपूरात 15 ऑगस्टसारखा एक नवस्वातंत्र्य दिन अवतरत आहे. मात्र यावेळी तो तिरंग्यापुरता मर्यादित नाही, तर तो असंख्य घरधारकांच्या जमिनीच्या हक्कांचा झेंडा फडकविणारा ठरणार आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी थेट अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. बल्लारपूर नगर परिषदेतील निवासी पट्टे वितरणाचे मिशन मूव्हमेंट जणू जाहीर केले आहे.
शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणांना कायदेशीर रूप देण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. सध्या 22 शीटवर कारवाई झाली असून, एक हजार 58नागरिकांनी पट्ट्यासाठी अर्ज केले आहेत. यातील 848 पक्की आणि 210 कच्च्या घरांच्या रहिवाशांना स्वतःच्या जमिनीचा अधिकार मिळणार आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी 210 कच्च्या घरांना स्वतंत्र पट्टे वाटपाचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. तोही एकदाच नव्हे तर लवकरच एकूण 452 पट्ट्यांसाठी मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन संपूर्ण मोहिमेला वेग देण्याचे संकेतही मुनगंटीवारांनी दिले.
Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच पुन्हा उमटेल
शासनाची बांधिलकी
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘विस कलमी’ सभागृहात आयोजित बैठकीत मुनगंटीवारांनी हा स्पष्ट संदेश दिला. प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, सीईओ पुलकित सिंग, तहसीलदार रेणुका कोकाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीना साळुंखे, उपविभागीय अधिकारी संजय पवार आदी उपस्थित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी अंमलबजावणीसाठी ठोस दिशा दिली.
या मोहिमेचा पहिला टप्पा बल्लारपूरसह विसापूर, चुनाभट्टी आणि अमितनगर या गावांपासून सुरू करण्यात येणार आहे. या गावांमधील घरधारकांना पट्टे देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. हे अभियान आता लोकांपर्यंत घर हक्काचं,जमीन आपली या घोषणेसह पोहचवले जाणार आहे.
Chandrashekhar Bawankule : मंत्र्यांमधील वादात स्थैर्याची सलगी
नियोजनशक्ती प्रभावी
4 हजार 592 मालमत्तांपैकी 2 हजार 774 पक्की घरे 18 शीटवर स्थित आहेत. ही संपूर्ण मालमत्ता प्रक्रिया पारदर्शकतेने पूर्ण करण्यासाठी एक स्वतंत्र कार्यसंघ नियुक्त करण्यात यावा, अशीही सूचना यावेळी करण्यात आली. आपल्या घरी राहणाऱ्या, परंतु कायद्यानं अधिकृत न ठरलेल्या हजारो कुटुंबांना आता स्वतःच्या जमिनीचा दस्तऐवज मिळणार आहे. केवळ दस्तऐवज नाही, तर शासनाच्या जबाबदारीचे एक ठोस प्रतिबिंब म्हणून या मोहिमेकडे पाहावे लागेल.
सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर विधानसभा क्षेत्र विकासाच्या गतीने पुढे सरकत आहे. झोपड्यांतून घरे, अतिक्रमणांमधून कायदेशीर स्थैर्य, आणि एका हताशतेतून हक्काच्या ओळखीपर्यंतचा प्रवास आता प्रत्यक्षात उतरतो आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी आहे एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व.