
स्वारगेट बलात्कार प्रकरणाने राज्यभर संतापाची लाट उसळली असताना सरकार मात्र गप्प आहे. महिलांच्या सुरक्षेवर केवळ घोषणाबाजी करणाऱ्या सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या निर्घृण बलात्काराच्या घटनेने राज्याला हादरवले असताना सरकार आणि प्रशासनाच्या अपयशावर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर अटक करण्यात आली असली, तरी हा प्रकार राज्यातील महिला सुरक्षेच्या दयनीय स्थितीवर आणि शासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवणारा आहे.

घटनेच्या निषेधार्थ पुण्यात युवक काँग्रेससह विविध संघटनांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. लष्कर पोलीस स्टेशनबाहेर युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले, ज्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे, युवक काँग्रेसने या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत गृहमंत्री आणि पालकमंत्री यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
सुरक्षेचा प्रश्न गंभीर
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरण ही अपवादात्मक घटना नसून, महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांची एक गंभीर कडी आहे. हे सरकार महिला सुरक्षेच्या नावाने केवळ घोषणाबाजी करत आहे, प्रत्यक्षात मात्र महिलांसाठी काहीही ठोस पावले उचलली जात नाहीत. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तपास मोहीम राबवून आरोपीला पकडले, मात्र हा गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांनी आणि प्रशासनाने उपाययोजना केली असती, तर आज एका निष्पाप तरुणीवर अशी भयावह वेळ आली नसती. बसस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित नसतील, तर सरकार नेमके काय करत आहे, असा प्रश्न आता नागरीक करु लागले आहेत.
केवळ आश्वासनं
दरवेळी अशी घटना घडली की सरकार आणि पोलिसांकडून “दोषींना कठोर शासन करू”, “महिला सुरक्षेसाठी उपाययोजना करू” अशी वचने दिली जातात. 2012 मधील दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतरही कठोर कायद्यांची गरज अधोरेखित झाली होती, मात्र तरीही महिलांवरील अत्याचार काही थांबत नाहीत. युवक काँग्रेसने स्पष्टपणे या प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. मात्र, सरकार यावर ठोस भूमिका घेणार की नेहमीप्रमाणे मूक गिळून बसणार, यावर सर्वांचे लक्ष वेधले आहे.
https://thelokhitlive.com/pune-swaragate-bus-stand-26-year-old-woman-brutal-rape-case-bjp-sitting-mla-dr-parinay-fuke-angry/
एसटी स्थानक धोकादायक
स्वारगेट बस स्थानक हे पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे रोज हजारो प्रवासी ये-जा करतात. तरीदेखील येथे सुरक्षेची ठोस व्यवस्था नाही. या घटनेने राज्यभरातील एसटी स्थानकांवरील महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा केला आहे. या घटनेनंतर देखील एसटी महामंडळ आणि राज्य सरकारने महिलांसाठी कोणतीही ठोस उपाययोजना जाहीर केलेली नाही. म्हणजेच हा प्रश्न भविष्यात पुन्हा उभा राहू शकतो.
शक्ती कायदा गरजेचा
राज्यातील महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचा असलेला ‘शक्ती कायदा’ हा अद्यापही अधांतरी आहे. महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी न मिळाल्याने तो अस्तित्वात आला नाही. मात्र, महायुती सरकारनेही या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. जर हा कायदा अस्तित्वात असता, तर अशा गुन्ह्यांसाठी जलदगती न्यायालये स्थापन होऊन, आरोपींना त्वरित कठोर शिक्षा झाली असती. मात्र, सरकारच्या उदासीन धोरणामुळे महिलांचे जीवन धोक्यात आहे.
Maharashtra: शहाबाजचा इशारा; मंत्रालय उडवण्याची पाकिस्तानी धमकी
सामाजिक लढा
महिला सुरक्षा हा केवळ राजकीय चर्चा करण्याचा मुद्दा नाही, तर तो संपूर्ण समाजाचा आणि व्यवस्थेचा आरसा आहे. जर अशा घटनांमध्ये सरकार केवळ राजकारणच करत राहिले, तर लोकांनीच पुढे येऊन सरकारला जबाबदार धरण्याची गरज आहे. युवक काँग्रेसने या प्रकरणात सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र नागरिकांनी देखील या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. जर दोषींना त्वरित फाशीची शिक्षा झाली नाही, तर महिला सुरक्षेच्या नावावर केवळ घोषणाबाजी करणाऱ्या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे.