
उपराजधानी नागपुरात काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला सुरुवात झाली आहे. यावर महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी तीव्र टीका केली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ १६ एप्रिल रोजी नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा असल्यामुळे संपूर्ण काँग्रेस यंत्रणा या दौऱ्यासाठी उत्साहात आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, गांधी गेट महाल येथून त्यांच्या सद्भावना मार्चला सुरुवात झाली आहे. मात्र, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केवळ आनंदाचे सूर नाहीत, तर काही गंभीर आणि ज्वलंत प्रश्नही उपस्थित होत आहेत. सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसकडून सद्भावना शांती मार्च काढण्यात आल्याने त्याच्या उद्देशावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी काँग्रेसच्या सद्भावना यात्रेवर कडाडून टीका केली आहे. नागपूर सध्या पूर्णपणे शांत आहे. नुकतीच ईद, राम नवमी आणि हनुमान जयंती शांततेत पार पडल्या. 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील शांततेत साजरी झाली. अशा शांत वातावरणात पुन्हा एकदा अशांततेचा रंग राजकीय हेतूने चढवणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. प्यारे खान यांनी पुढे सांगितले की, राम नवमीच्या दिवशी मुस्लिम तरुणांनी हिंदू बांधवांवर फुलांची उधळण केली, एकमेकांना गळाभेट दिल्या. अशा सौहार्दाच्या वातावरणात शांती यात्रेचे आयोजन म्हणजे केवळ राजकीय प्रसिद्धीसाठीचा प्रयत्न आहे.
पोलिसांशी संवाद साधा
प्यारे खान पुढे म्हणाले की, जर काही करायचेच असेल, तर शांती यात्रेऐवजी संकटात असलेल्या लोकांच्या मदतीसाठी पुढे या. जेलमध्ये असलेल्या निष्पापांना न्याय मिळवून द्या. सरकारशी बोला, पोलिसांशी संवाद साधा. दुसरीकडे काँग्रेसने आपल्या सद्भावना पदयात्रेचा उद्देश स्पष्ट करत सांगितले की, हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे. तो महाराष्ट्राच्या समृद्ध सामाजिक-सांस्कृतिक परंपरांचा गौरव करण्यासाठी राबवला जात आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा राज्यभर सामाजिक बंधुभाव, सलोखा आणि शांततेचा संदेश पोहोचवेल, असा काँग्रेसचा दावा आहे. कबरीसंदर्भातील एका वादातून उसळलेल्या दंगलीनंतर शहरात तणावाचे वातावरण होते.
दंगलीच्या वेळी एका धर्मग्रंथाच्या विटंबनेची अफवा पसरली आणि त्यानंतर हिंसाचार भडकला. पोलिसांवर दगडफेक झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कठोर कारवाई करावी लागली. या दरम्यान 114 हून अधिक व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आणि 13 गुन्हे दाखल झाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शांती यात्रेला मिळणारा प्रतिसाद आणि त्याच्या राजकीय परिणामांची चर्चा आता जोमात सुरू आहे. विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांनी यात्रेच्या उद्देशामागे शांततेचा हेतू असल्याचे म्हटले आहे. तर विरोधक आणि सामाजिक नेतृत्व या यात्रेकडे संशयाने पाहत आहेत.