नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला इको फ्रेंडली बकरीद साजरी करण्याचा सल्ला देत वादग्रस्त विधान केल्यावर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.
राज्याच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारा वाद उफाळून आला आहे. मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम समाजासंबंधित चर्चांना पुन्हा एकदा वळण लागले आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेल्या असंतोषाच्या फेऱ्या थांबत नाहीत, तोच राणेंनी गोवंशबंदी, कुर्बाणी आणि बकरीद साजरी करण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेत आणखी एक ठिणगी टाकली आहे. या वक्तव्यामुळे अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नितेश राणेंवर सडकून टीका केली.
खान यांनी राणे यांच्यावर इस्लामचा अपमान केल्याचा आरोप केला. पण राणेंनी देखील संयम सोडत, त्याच भाषेत प्रत्युत्तर देत म्हटलं खरंतर इस्लामचा अपमान प्यारे खानच करत आहेत. राणे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, सण साजरे करताना पर्यावरणाचे भान ठेवायला हवं. हिंदूंना होळी, दिवाळीवर सल्ले दिले जातात. मग मुस्लिम समाजालाही इको फ्रेंडली बकरीद साजरी करण्याचा सल्ला दिला तर त्यात गैर काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी प्यारे खान यांना उघड आवाहन केलं. तुम्ही स्वतः मुस्लिम समाजाच्या भल्यासाठी आवाज उठवा.
धार्मिक सलोखा गरजेचा
प्यारे खान यांना सांगा की बकरी ईदही हरित पद्धतीने साजरी करता येते. यात कोणताही धार्मिक अपमान नाही, उलट सामाजिक सलोखा जपण्याचा हा मार्ग आहे. राणेंनी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं हिंदू समाजाने अनेक वर्षांपासून पर्यावरणतज्ज्ञांचे ऐकून फटाक्यांविना दिवाळी, नैसर्गिक रंगांची होळी साजरी केली आहे. त्यांनी कधी इतर धर्मांवर बोट दाखवले नाही. मग मुस्लिम समाजानेही तशीच जबाबदारी स्वीकारायला हवी. बकरीद दरम्यान होणाऱ्या जनावरे कत्तलीमुळे काही भागात तणाव निर्माण होतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. हिंदू नागरिक त्रस्त होतात.
अश्या गोष्टी पुढे जाऊन दंगे घडवू शकतात. जर मी एक सल्ला दिला, तर त्यावर राजकारण न करता त्याचा विचार व्हायला हवा. राणे यांच्या म्हणण्यानुसार, प्यारे खान माध्यमांमध्ये आक्रमक टीका करतात, पण प्रत्यक्षात भेटल्यावर नम्रपणे हात जोडतात. ही भूमिका प्रामाणिक नाही, असं ते म्हणाले. त्यांनी खान यांना सल्ला दिला की त्यांनी मुस्लिम समाजाला योग्य दिशादर्शन करावं, कारण सणांचा उद्देश माणुसकी आणि समजुतीचा असतो, टोकाच्या भावना भडकवण्याचा नव्हे. माझं उद्दिष्ट द्वेष पसरवणं नाही, तर स्थैर्य राखणं आहे, असं सांगत राणेंनी एक गोष्ट स्पष्ट केली. इको फ्रेंडली बकरीद ही समाजात समतेचा पूल बांधणारी संकल्पना आहे. यामुळे दोन्ही समुदायांमध्ये समज वाढेल आणि महाराष्ट्र शांत राहील.