राहुल गांधी यांनी चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मत चोरी झाल्याचा आरोप केला होता. मात्र प्रशासनाने त्यावर तत्काळ स्पष्टीकरण दिले आहे.
चंद्रपूरच्या राजूरा विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत घोटाळ्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात प्रशासनाला यश आलं आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत राजूरा मतदारसंघात हजारो मतदारांची नावं हटवली गेली आणि 6 हजार 850 नवीन नावं जोडली गेल्याचा गंभीर आरोप गुरुवारी (18 सप्टेंबर रोजी) केला होता. या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघालं. पण राजूरा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी सतर्कतेनं पावलं उचलत हा डाव उधळून लावला. तब्बल 6 हजार 861 संशयास्पद अर्ज वेळीच नाकारण्यात आले. ज्यामुळे बोगस मतदार नोंदणीला पूर्णविराम मिळाला.
आमच्या सतर्कतेमुळे मतदार यादी शुद्ध राहिली, असं ठामपणे सांगताना मतदार नोंदणी अधिकारी रविंद्र माने यांनी या कारवाईचं श्रेय प्रशासनाच्या चाणाक्षपणाला दिलं आहे. भारत निवडणूक आयोगानं 6 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाला हिरवा कंदील दाखवला होता. या कालावधीत राजूरा मतदारसंघात 6 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली. तर 30 ऑगस्टला अंतिम यादी जाहीर करण्यात आली. यानंतर 1 सप्टेंबरपासून निरंतर मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. प्रक्रियेत काही संशयास्पद अर्ज आढळल्यानं प्रशासनानं तातडीनं कारवाईचा बडगा उगारला.
Parinay Fuke : सत्तेच्या खुर्चीला नाही, जनतेच्या हाकेला प्राधान्य
पोलिसांमार्फत तपास सुरू
ऑनलाइन पद्धतीनं आलेल्या अर्जांवर कडक नजर ठेवत प्रशासनानं बोगस नोंदणीचा कट उघडकीस आणला. 1 ते 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राजूरा मतदारसंघात तब्बल 7 हजार 592 नवीन मतदार नोंदणी अर्ज दाखल झाले. सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि तहसीलदार, राजूरा यांनी या अर्जांची कसून तपासणी केली. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक अर्जाची बारकाईनं चौकशी केली. तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. यापैकी 6 हजार 861 अर्जांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या. काही अर्जदारांचे पत्ते चुकीचे होते, काहींचे फोटो आणि पुरावे गायब होते. तर काही अर्जदारांचं अस्तित्वच सापडलं नाही. या त्रुटींमुळे हे अर्ज रीतसर नाकारण्यासाठी 17 ऑक्टोबरला जिल्हा कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला.
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. मतदार नोंदणी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी, राजूरा यांना सर्व अर्जांची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले गेले. या चौकशीतून बोगस अर्जांचा डोंगर उघड झाला. हे अर्ज नाकारण्यात आले आणि याप्रकरणी राजूरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत. या प्रकरणात प्रशासनाच्या सतर्कतेने मतदार यादीचे पावित्र्य राखले गेले आहे. कोणत्याही तक्रारीची वाट न पाहता आम्ही स्वतःहून कारवाई केली, असं रविंद्र माने यांनी सांगितलं. या कारवाईमुळे राजूरा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणीला आळा बसला आणि निवडणूक प्रक्रियेवरचा नागरिकांचा विश्वास आणखी दृढ झाला. पोलिस तपासातून या घोटाळ्यामागील मास्टरमाइंड समोर येण्याची शक्यता आहे.
