विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार आता आमदारांच्या खासगी कर्मचाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना अधिवेशन सुरु असताना विधिमंडळ परिसरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधान भवनात झालेल्या राड्याचे गंभीर पडसाद उमटले आहेत. या राड्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कडक शिस्तीची छडी उगारली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार आता आमदारांच्या खासगी कर्मचाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना अधिवेशन सुरु असताना विधिमंडळ परिसरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. विधानसभा अध्यक्षांनी हाणामारीच्या घटनेनंतर मोठा निर्णय घेतला आहे.
अधिवेशन चालू असताना केवळ आमदार, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. अन्य कोणालाही प्रवेश आता बंद केला जाणार आहे. पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या फालतूपणामुळे विधानभवनात कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसणार आहे. इतकेच नव्हे तर मंत्री, आमदार यांना भेटण्यासाठी येणाऱ्या सामान्यांनाही आता प्रवेश मिळविण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अधिवेशन काळात विधिमंडळातील सभागृहांमध्ये मंत्र्यांना बैठका न घेण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले आहेत.
Monsoon Session : हातवारे झाले वादाचे वारे, आता हात जोडून क्षमायाचना
नीतीमूल्य समिती नेमणार
आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर आता विधिमंडळात नीतीमूल्य समिती नेमण्यात येणार आहे. लोकसभेच्या धर्तीवर नीती मूल्य समिती काम करणार आहे. विधान परिषदेच्या सभापतींशी विचार विनिमय करण्यात येणार आहे. गटनेत्यांशी देखील संवाद साधला जाणार आहे. मंत्र्यांच्यावतीने देखील बरेचदा अभ्यागतांना प्रवेश देण्यासाठी विनंती करण्यात येते. मात्र आता विधान भवनात असे बैठकसत्र होणार नाही. मंत्र्यांनी मंत्रालयातच बैठक घ्यावी, असे नार्वेकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. आता अध्यक्ष आणि सभापती यांचा समावेश असलेल्या मंडळाची मान्यता घेतल्याशिवाय मंत्र्यांना देखील विधानमंडळात बैठक घेता येणार नाही. अभ्यागतांना प्रवेश देण्याची परवानगी देण्यात येणार नाही
विधिमंडळ परिसरातील हाणामारीनंतर झालेल्या घटनाक्रमाविषयी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आव्हाड यांनी यावर संताप व्यक्त करत आपल्यावर खुशाल गुन्हे दाखल करा असे आव्हानच पोलिसांना दिले आहे. आम्हाला फसवलं गेले, अशी माझ्या आणि जयंत पाटील यांच्यात मनामध्ये भावना निर्माण झाली असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
Vijay Wadettiwar : लाथा – बुक्क्यांचा नंगानाच, वडेट्टीवारांची अध्यक्षांना हाक
कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात येणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले होते. अध्यक्षांनी त्यांचा शब्द पाळलेला नाही, याचे दुःख वाटत असल्याचे देखील आव्हाड यांनी म्हटले. अध्यक्ष आणि पोलिसांनी व्हिडीओ फूटेज पाहिल्यानंतरच कारवाई करावी, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. मारहाणीचा प्लॅन आधीच ठरलेला होता, असा दावा देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.