महाराष्ट्र

Akola : भाजपचा गाफीलपणा आणि साजिद खान पठाण यांनी मारली बाजी

Raj Rajeshwar Temple : भारतीय जनता पार्टी अद्यापही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये

Post View : 1

Author

अकोल्यातील राजराजेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी श्रेय घेण्याची संधी साधली आहे. भाजपच्या गाफीलपणामुळे पुन्हा एकदा राजकीय रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर. राजराजेश्वर मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा, माजी खासदार संजय धोत्रे यांनी देखील यासाठी प्रयत्न केले. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात येऊन गेले. त्यावेळी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी राजराजेश्वर मंदिराबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. महाराष्ट्रात भाजपप्रणीत महायुतीची सत्ता असल्यामुळे या प्रस्तावाला लवकर मंजुरी मिळेल, असे सांगितले जात होते.

विशेष म्हणजे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत चुकीचा उमेदवार निवडण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी जितकी ताकद अकोल्यात लावली, ती ताकद चुकीचा उमेदवार निवडल्यामुळे धुळीस मिळाली. त्यानंतर काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी झाले. भाजपचा अकोला पश्चिममधील मजबूत गड ढासळला. आता लवकरच महापालिका निवडणूक होणार आहे. अशा परिस्थितीत महापालिकेवर सत्ता मिळवणे भाजपसाठी अत्यावश्यक ठरणार आहे.

माहितीच मिळाली नाही

विधानसभा निवडणुकीनंतर जर आता महापालिका महाविकास आघाडीच्या हातात गेली, तर विकासाचे चित्र बिघडू शकते, हे भाजपच्या लक्षात आले आहे. मात्र काही बाबतीत भाजपचा गाफीलपणा त्यांना चांगलाच भोवला. याचे जिवंत उदाहरण म्हणजे राजराजेश्वर मंदिराला मिळालेला ‘ब’ वर्ग दर्जा. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता असूनही, राजराजेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याची माहिती सर्वप्रथम भाजपच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकली नाही. मात्र या सर्व घडामोडींमध्ये साजिद खान पठाण आणि त्यांच्या समर्थकांनी बाजी मारली.

अकोल्यात काँग्रेसला ही माहिती सर्वप्रथम मिळाली. त्यांनी यासंदर्भात अकोल्यात तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. वास्तविक विरोधी पक्षातील एका आमदाराची मागणी कोणतेही सरकार सहजतेने मान्य करत नाही. विशेषतः साजिद खान पठाण यांच्या बाबतीत तर भाजप आजही त्यांना दंगलीचा मुख्य आरोपी म्हणून प्रचारात नमूद करते. त्यामुळे पठाण यांनी केलेल्या मागणीवरून राजराजेश्वर मंदिराला दर्जा मिळाला, हे सहज पचनी पडणारे नाही.

Akola : राज राजेश्वर मंदिर श्रेयवादाच्या धुळवडीत मदन भरगडांचा बॉम्ब 

राजराजेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा मिळाल्याचे श्रेय कोणी कितीही नाकारले, तरी ते भाजपचेच आहे. मात्र, जी योजना भाजपने सादर केली, त्याच योजनेची माहिती अकोल्यातील भाजप नेत्यांना मिळवता आली नाही किंवा त्यांनी ती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. परिणामी, भाजप गाफील राहिली. साजिद खान पठाण यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतःला ‘हिरो’ ठरवले. आता संपूर्ण शहरात त्यांच्या कौतुकाचे बॅनर्स झळकू लागले आहेत. हेच जर कायम राहिले आणि भारतीय जनता पार्टी जर ओव्हर कॉन्फिडन्समध्येच राहिली, तर विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिममध्ये जे ‘पानिपत’ झाले, त्याचीच पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीत होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

मातृभूमी (अकाेला), सकाळ (अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती), दैनिक भास्कर हिंदी (मराठवाडा वृत्त विभाग प्रमुख) , महाराट्र टाइम्स (नागपूर), भास्कर समूहाचे मराठी दैनिक दिव्य मराठी (अमरावती), सकाळ माध्यम समूहाचे पॉलिटिकल वेब पोर्टल सरकारनामा असा प्रसन्न यांचा पत्रकारितेचा सुमारे 26 वर्षांचा प्रवास आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते प्रसन्न यांचा शोध प्रबंध भुवनेश्वर येथील भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रकाशित करण्यात आला. क्राइम रिपोर्टिंग पासून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रसन्न यांनी गडचिरोली, छत्तीसगडमधील बक्स, अबुजमाड या नक्षलवाद्यांची भीषण दहशत असलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील अनेक निवडणुकीचे रिपोर्टिंगही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (सिमी) आणि दिनदार-ए-अंजुमन या दोन प्रतिबंधित संघटनांचे नेटवर्क उद्ध््वस्त करणारे रिपोर्टिंगही त्यांनी केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याकुब मेमन याच्या फाशीच्या घटनेचे ‘ऑन द स्पॉट’ आणि कुठेही न प्रकाशित झालेले वार्तांकनही त्यांनी नागपूर येथे केले.

More Posts

Follow Me:Add me on XAdd me on Facebook

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!