
राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानंतर महायुती सरकारनं आणखी एक महत्वाचा निर्णय शाळांबाबत घेतला आहे.
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गर्जा महाराष्ट्र माझा. श्रीनिवास खळे यांनी अजरामर केलेलं शाहीर साबळे यांच्या आवाजातील हे गीत आजही लोकांच्या अंगावर रोमांच आणते. आता हे गीत साधंसुधं उरलेलं नाही. महाराष्ट्राचं ते राज्यगीत बनलं आहे. तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर आमदार मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळं महाराष्ट्राला महायुती सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये हे राज्यगती मिळालं. तेव्हापासून राष्ट्रगीतानंतर राज्यगीतही अत्यंत सन्मानानं सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये गायलं जात आहे. जेव्हा जेव्हा हे गीत वाजेल तेव्हा तेव्हा श्रीनिवास खळे, शाहीर साबळे यांच्यासह एक नाव इतिहासातील पानांवर नक्कीच दिसेल. हे नाव असेल सुधीर मुनगंटीवार यांचं.
महाराष्ट्राला राज्यगीत कोणी दिलं आणि केव्हा दिलं असा प्रश्न जेव्हा भविष्यातील सामान्य ज्ञानाच्या स्पर्धांमध्ये विचारला जाईल तेव्हाही मुनगंटीवार हे नाव आवर्जुन घेतलं जाणार आहे. आता याच राज्यगीताबद्दल महायुती सरकारनं मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक शाळेत आता राज्यगीत गायलं जाणार आहे. राज्यातील प्रत्येक शाळेत दैनंदिन शैक्षणिक तासिका सुरू होण्यापूर्वी सामूहिक प्रार्थना घेण्यात येते. राष्ट्रगितापासून त्याची सुरुवात होते. आता राष्ट्रगितानंतर राज्यगीत गायन बंधनकारक करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली.

शाळांबाबत Important Decision
राज्यातील शाळांबाबत महायुती सरकारनं अलीकडेच मोठा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. शाळा राज्य बोर्डाची असो की सीबीएसई, आयसीएसई मराठी विषय अनिवार्य राहणार आहे. आतापर्यंत शाळांकडून वेगवेगळ्या बोर्डांच्या नियमाचं कारण सांगत यातून पळवाट काढण्यात येत होती. आता ही पळवाट काढता येणार नाही. मराठीच्या या निर्णयानंतर राज्यातील शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न देखील राबविण्यात येणार आहे. त्यामुळं पहिलीपासून विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाचं शिक्षण मिळणार आहे. शाळांबाबत या दोन महत्वाच्या निर्णयानंतर महायुती सरकारनं आणखी एक निर्णय घेतला आहे.
नव्या निर्णयानुसार सर्व शाळांमध्ये राज्यगीत म्हणावं लागणार आहे. लवकरच यासंदर्भातील सर्व शासन निर्णय काढण्यात येणार आहे. त्यानंतर शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गायलं जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळं महाराष्ट्रातील प्रत्येक पिढीला आता दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे कळत राहणार आहे. अलीकडच्या काळातच केंद्र आणि राज्य सरकारनं शालेय अभ्यासक्रमातून अनेक आक्षेपार्ह कविता, धडे वगळले आहेत. केंद्र सरकारनंही नवीन शैक्षणिक धोरण अवलंबिलं आहे. स्थानिक भाषेतून शिक्षणाला त्यात महत्व देण्यात आलं आहे. अशात महाराष्ट्रात मराठी विषय अनिवार्य करण्याचा निर्णयही महत्वाचा आहे. त्यासोबतच शाळेतून राज्यगीताला दिला जाणारा सन्मानही विद्यार्थ्यांच्या मनावर दूरगामी सकारात्मक परिणाम करणारा ठरणार आहे.