
सध्या नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विधान परिषद सभापतीची निवड करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनात भाजपचे नेते प्रा. राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतिपदी करण्यात आली. प्रा. शिंदे यांनी विधान परिषदेच्या सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला होता. गुरुवार, 19 डिसेंबर रोजी ही निवडणूक पार पडली. त्यावेळी प्रा. शिंदे यांची सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर आता शुक्रवार, 21 डिसेंबर रोजी अधिवेशनाचा समारोप होणार आहे. प्रा. शिंदे यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे तसेच विरोधकांचे आभार मानले.
श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषद सभागृहात राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी यासंबंधीचा प्रस्ताव मांडला. मनीषा कायंदे, अमोल मिटकरी, शिवाजी गर्जे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. आवाजी मतदानातून राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. विधान परिषदेच्या उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राम शिंदे यांच्या निवडीची औपचारिक घोषणा सभागृहात केली. निवडीनंतर फडणवीस म्हणाले की, प्राध्यापक राम शिंदे हे सर आहेत. त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे.

दोन्ही सभागृहात BJP
राम शिंदे यांच्या निवडीमुळं विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही ठिकाणी भाजपचं वर्चस्व निर्माण झालं आहे. विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीसाठी राम शिंदे यांनीच एकमेव अर्ज दाखल केला होता. त्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात होती. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांची 7 जुलै 2022 रोजी मुदत संपली होती. तेव्हापासून विधान परिषदेचे सभापतिपद रिक्त होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली.
राम शिंदे यांना उद्देशून पवार म्हणाले, तुमच्या मतदारसंघात मी सभा घेतली नाही. त्यामुळं तुम्ही थोडासा राग व्यक्त केला. त्यामुळे विधानसभा निवडणूक हरल्याचेही आपण म्हणाला. पण, एका दृष्टीने ते योग्य झालं. जर विधानसभा निवडणुकीत निवडून आला असता देवेंद्रजींनी ठरवले असते तर मंत्रीही झाला असता. त्यामुळे गरीशला (महाजन) कदाचित थांबावे लागले असते. हे सर्व जाऊद्या, पण आज तुम्ही विधिमंडळात सर्वोच्च स्थानी आहात.
2009 मध्ये आमदार
राम शिंदे 2009 मध्ये पहिल्यांदा नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये सलग दुसऱ्यांदा विजयी झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून ते कार्यरत होते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला होता. आता ते विधान परिषदेचे सभापती झाले आहेत.