
आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला शहरातील नालेसफाई 6 जूनपूर्वी पूर्ण करण्याचे महापालिकेला आदेश दिले. पावसाळ्यात नागरिकांचे घर पाणीमुक्त ठेवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे.
अकोला शहरातील पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई ही नेहमीच गोंधळात सापडणारी बाब आहे. मात्र यंदा शहरातील पावसाळ्यातील समस्या टाळण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील मुख्य 27 नाले आणि उपनगरातील मिळून एकूण 140 नाल्यांची साफसफाई सहा जूनपूर्वी पूर्ण करावी, असे स्पष्ट आदेश त्यांनी महापालिका आयुक्त सुनील लहाने यांना दिले.
अकोला शहरातील अनेक भागांमध्ये दरवर्षी पावसात घरात पाणी घुसण्याचे प्रकार घडतात. उमरी, बारा ज्योतिर्लिंग परिसर, रेणुका नगर, डाबकी रोड, कृषी नगर, गीता नगर आणि शिवसेना वसाहत या परिसरातील नागरिकांना दरवर्षी याचा त्रास सहन करावा लागतो. ही स्थिती बदलण्यासाठी मनपाने सुरू केलेल्या साफसफाई मोहिमेस अधिक गती देण्याचे निर्देश आमदार सावरकर यांनी दिले आहेत.

पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर तयारी
शहरातील नाले साफ होणे ही केवळ स्वच्छतेची बाब नाही. ती नागरिकांच्या सुरक्षेशी थेट संबंधित आहे. त्यामुळे या कामात कोणतीही ढिलाई न करता, युद्धपातळीवर कारवाई व्हावी, असे आमदार सावरकर यांचे स्पष्ट मत आहे. अनेक ठिकाणी महापालिकेने नाल्यांची रुंदी वाढवली असली तरी त्याची नियमित साफसफाई झाली नाही, तर पाण्याचा अडथळा होऊन पूरसदृश स्थिती निर्माण होऊ शकते.
रिगल टॉकीज, शालिनी टॉकीज, चित्रा टॉकीज, पोला चौक या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, अशा सूचनाही आमदार सावरकर यांनी दिल्या आहेत. या भागातून शहरातील सांडपाणी थेट मोरणा नदीत मिसळते. त्यामुळे या परिसरातील नाल्यांची विशेष स्वच्छता करणे अत्यावश्यक आहे. नदीकाठील भागातही मोठ्या प्रमाणात साफसफाई करण्यात यावी, जेणेकरून पावसाचे पाणी अडणार नाही व नागरिकांना धोका टाळता येईल.
बाधित भागासाठी उपाययोजना
आमदार सावरकर यांनी शहरातील ज्या भागांमध्ये दरवर्षी पावसाचे पाणी घरात शिरते, त्या भागांची नोंद घेऊन त्या ठिकाणी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने आतापासून सजग राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मोहिमेचे केवळ देखाव्यासारखे काम न करता, तीव्र प्रभावी अंमलबजावणी व्हावी, हे सुद्धा सावरकर यांनी स्पष्ट केले आहे. नालेसफाईची प्रत्यक्ष गुणवत्ता तपासावी व आवश्यकतेनुसार पुनरावलोकन करावे, असेही त्यांनी प्रशासनाला बजावले. नागरिकांचा त्रास टाळणे, पाणी साचण्याचे प्रमाण कमी करणे. शहरी आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करणे या दिशेने काम व्हावे, यासाठी आमदार सावरकर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे.
आयुक्तांची सकारात्मक भूमिका
आमदार रणधीर सावरकर यांच्या सूचनांनंतर महापालिका आयुक्त सुनील लहाने यांनीही सकारात्मक भूमिका घेत, नालेसफाई मोठ्या प्रमाणात व नियोजनबद्ध रीत्या राबवली जाईल, अशी ग्वाही दिली आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि दैनंदिन जीवन सुरळीत राहावे, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पावसाळा काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना, अकोल्यात आमदार सावरकर यांच्या पुढाकारामुळे नालेसफाई मोहिमेला नवे बळ मिळाले आहे. त्यांच्या सक्रियतेमुळे आणि प्रशासनाच्या प्रतिसादामुळे, यंदाचा पावसाळा अकोल्यातील नागरिकांसाठी अधिक सुरक्षित आणि त्रासमुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दुहेरी जबाबदारी
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला मोठा फटका बसला. चुकीचा उमेदवार निवडल्यामुळे भाजपला हा मतदारसंघ गमवावा लागला. अकोला महापालिकेचे क्षेत्र अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात येते. त्यामुळे आमदार रणधीर सावरकर यांना आता अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम या दोन्ही मतदारसंघाची काळजी घ्यावी लागत आहे.
रणधीर सावरकर ही जबाबदारी अत्यंत सक्षमपणे पार पाडत आहेत. त्यामुळेच आमदार रणधीर सावरकर यांनी स्वतः पुढाकार घेत अकोला शहराला पुराच्या तळाक्यापासून वाचवण्यासाठी सकारात्मक व आग्रही पुढाकार घेतला आहे. सावरकर यांच्या मतदारसंघात देखील पूर्णा नदी वाहते. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील पूर संरक्षण योजना राबविण्यासोबतच अकोला शहराला देखील बुडण्यापासून वाचवण्याची जबाबदारी आता आमदार रणधीर सावरकर यांनी सक्षमपणे सांभाळल्याचे दिसत आहे.