प्रशासन

RTMNU : संविधान शिकण्याची सुवर्णसंधी आता प्रत्येक विद्यार्थ्याला

Nagpur: शिक्षणातून सजग राष्ट्रनिर्मितीचा संकल्प

Author

नागपूर विद्यापीठाने प्रत्येक विद्यार्थ्याला भारतीय संविधान शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार 2 क्रेडिटचा अभ्यासक्रम सर्व अभ्यासक्रमांमध्ये लागू करण्यात आला आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महत्त्वाचा निर्णय घेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात भारतीय संविधानाचे महत्त्व खोलवर रुजविण्याचे ठरवले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाने दोन क्रेडिटचा संविधान विषय अनिवार्य केला आहे. यामुळे संपूर्ण देशात संविधान अभ्यासक्रम अनिवार्य करणारे हे पहिले विद्यापीठ ठरले आहे.

संविधान विषय अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे विद्यापीठातील जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांना संविधानाचे धडे मिळणार आहेत. त्यांचा लोकशाहीतील सहभाग अधिक सजग आणि जबाबदारीपूर्ण होण्याची अपेक्षा आहे. प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार व कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनात ही अंमलबजावणी घडून आली आहे.

Sanjay Rathod : प्रशासनाच्या नव्या सूत्रांनी जलविकासात नवसंघटन

अध्ययन अनिवार्य

विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव विज्ञान तसेच आंतरविद्याशाखीय अभ्यास या विद्याशाखांतील जवळपास 350 अभ्यासक्रमांमध्ये संविधानाचा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक शाखेतील विद्यार्थी त्यांच्या क्षेत्राशी संबंधित संविधानिक संदर्भ आत्मसात करू शकतील. उन्हाळी 2025 परीक्षेत दुसऱ्या सेमिस्टरपासून हा विषय बंधनकारक करण्यात आला आहे.

पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी संविधान विषय लागू करण्यात आला आहे. त्यास परीक्षेचा घटक म्हणूनही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे हा विषय केवळ औपचारिक न राहता विद्यार्थी त्याचे सखोल अध्ययन करतील, अशी अपेक्षा आहे.

Nagpur Police : देशभरात चमकले नागपूरचे हिरो 

त्रैभाषिक पुस्तक उपलब्ध

संविधान विषय अनिवार्य करण्याच्या या उपक्रमाच्या मुळाशी आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विधी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविशंकर मोर यांची संकल्पना. त्यांनी ही कल्पना तत्कालीन कुलगुरू दिवंगत डॉ. सुभाष चौधरी यांच्यापर्यंत पोहोचवली होती. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यापीठात याचा पाया घालण्यात आला. सर्व अभ्यास मंडळांनी या विषयास संमती दिली आणि त्यानुसार धोरणात्मक बदल करण्यात आले.

संविधानाचे महत्त्व प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सहज पोहोचावे, यासाठी विद्यापीठाने एक संक्षिप्त, सुसंगत व समजण्यास सोपे असे पुस्तक तयार केले आहे. 30 ते 40 पानांमध्ये संविधानाचे मूलतत्त्व स्पष्ट करणारे हे पुस्तक मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये तयार करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ते निःशुल्क उपलब्ध करून दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक जडणघडणीत संविधानाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांचे विचार अधिक समतोल, विवेकी व राष्ट्रनिष्ठ होण्यासाठी हा अभ्यासक्रम मोलाचा ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!