
लोकसभा निवडणुकीत दणकुन पराभव आणि कॅबिनेट मंत्रिपदाची हुलकावणी यानंतर आमदार रवी राणा यांना उशिरानं का होईना शहाणपण सुचलेलं दिसत आहे.
आठ दिवसाआधी मला मंत्रिपदाची शथप घ्यायची आहे, यासाठी फोन आला. पण अखेरच्या क्षणी काय झालं ठाऊक नाही. मला मंत्रिपदानं हुलकावणी दिली. बडनेराचे आमदार रवी राणा यांनी मनातील खंत बोलून दाखविली. आता त्यांनी अमरावतीमधील सर्व राजकीय नेत्यांना मतभेद विसरून एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. उशिरानं का होईना रवी राणा यांना थोडं शहाणपण सुचलेलं दिसत आहे. हे त्यांचं शहाणपण खरं आहे की नकली हे लवकरच कळेलच. पण ‘गाव वालो से बैर’ किती महागात पडतं याचा प्रत्यय त्यांना दुसऱ्यांदा आला आहे.

कोणाशीही न पटणारे नेते म्हणून रवी राणा आणि नवनीत राणा यांची सर्वत्र ओळख आहे. राणा हे संधीसाधू आहेत. कालपर्यंत सत्ता होती म्हणून जे अजित पवार यांना चिटकले होते. अजित पवार यांची उपयोगिता संपल्यानंतर ‘बदलती हवा का रूख’ पाहून ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या कंपुत घुसले. रवी राणा यांना राजकारणात कोणाशीच पटत नाही.
रवी राणा यांनी ज्यावेळी विवाह केला, त्यावेळी त्यांनी अमरावतीत मेगा सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सोहळ्यात विघ्न आणलं असा राणा यांचा आरोप होता. त्यावेळी अमरावतीच्या राजापेठ भागातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत राणा यांनी पवारांवर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं.
लगेच U Turn
या पत्रकार परिषदेनंतर काहीच दिवसात राणा यांना पलटी मारली. ज्या अजितदादांना शिव्या दिल्या, त्याच दादांशी राणा यांनी जवळीक साधली. नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला. निवडणूक जिंकताच राणा यांनी पुन्हा कोलांटउडी मारली. ते भाजपकडे गेले. काहीही कारण नसताना राणा दाम्पत्य नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची आरती ओवाळू लागले.
अर्थात ही त्यांची चापलूसी आहे, हे समजण्याइतके मोदी आणि फडणवीस नक्कीच कच्चे खिलाडी नाहीत. राणा यांनी जान आपटली, पण नवनीत राणा यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. मोदी, शाह आणि फडणवीस यांना खुश करण्यासाठी राणा दाम्पत्यानं बरीच नौटंकी केली. या नादात त्यांनी अमरावतीत सगळ्यांशीच दुश्मनी केली.
बच्चू कडू यांच्याशी पंगा घेतला. यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली. अडसूळ यांच्याशी असलेला वाद तर कोर्टापर्यंत गेला आहे. प्रवीण पोटे पाटील यांच्याशी राणा यांचं पटत नाही. महायुतीत असताना रवी राणा यांनी सुलभा खोडके आणि संजय खोडके यांच्या विरोधात प्रतिक्रिया दिली.
भाजपशी चापसुली करून राणा यांनी पत्नी नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला. अमरावतीमधील भाजप ते वापरू लागले. त्यामुळं भाजप आणि संघाचे कार्यकर्ते दुखावले. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच राणा यांनी कार्यकर्त्यांना विजयोत्सव साजरा करायला लावला. निकाल लागला तेव्हा त्यांचा पोपट झाला. नवनीत राणा पराभूत झाल्या.
पुन्हा एकदा Try Try
केंद्रामध्ये डाळ शिजणार नाही हे लक्षात आल्यानंतर राणा राज्यातील नेत्यांच्या मागे लागले. विधानसभा निवडणुकीनंतर नवनीत राणा आणि रवी राणा फडणवीस यांच्या ‘सागर’ किनारे अक्षरश: अनेक दिवस बसून होते. एखादा खरमुरे विकणाराही इतके दिवस समुद्राच्या किनाऱ्यावर सतत बसून राहात नाही, तितके दिवस ते सातत्यानं सागर बंगल्यामध्ये घुटमळत होते.
राणा यांना लोकांच्या कल्याणासाठी नव्हे तर आपला बदला घेण्यासाठी मंत्रिपद हवं होतं, हे फडणवीस यांना लक्षात आलं होतं. राणा यांच्या हाती मंत्रिपद देणं म्हणजे अमरावती हातची गमाववणं हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळं भाजपनं राणा यांना तात्पुरता होकार दिल्याचं दिसतं.
राणा ते मुळातच ‘इममॅच्युअर’पणे वागतात असा आरोप होतो. लोकसभा निवडणुकीत राणा यांनी आधीच बॅनरबाजी करून आपलं हसू करून घेतलं होतं. एकदा दुधानं तोंड पोळलं तर ताकही माणूस फुंकुन फुंकुन पितो. पण राणा यांनी धडा घेतला नाही. फडणवीसांनी सांगितलं आणि राणा यांनी कार्यकर्त्यांना अमरावतीभर फलकबाजी करायला लावली.
अमरावतीत लगे राणा भावी कॅबिनेट मंत्री असे फलक लागले. खरं तर राणा यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त ओळखलेलीच नाही. भाजप आणि संघाचा असला फालतूपणा कधीच आवडत नाही. चमकोगिरी तर अजिबात खपत नाही. त्यामुळं राणा यांची चमकोगिरी लगेच सगळ्यांच्या लक्षात आली.
एक उपमुख्यमंत्री कोमात, दुसरा कोमातून बाहेर; Vijay Wadettiwar यांची टीका
कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या विस्तारात जिथे भाजपनं अच्छाअच्छांना डच्चू दिला, तिथे राणा ‘किस खेत के मुली’ असं समीकरण पुढं आलं. सगळीकडून तक्रारी आल्यामुळं भाजपहीं राणा यांना ‘होल्ड’वर टाकून दिलं. पुन्हा राणा यांचं हसू झालं. मंत्रिपद न मिळाल्यानं राणा तरा तरा अधिवेशनातून निघून गेले. झालं काय तर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या पायाजवळ यावंच लागलं. कारण राणा यांच्याजवळ दुसरा पर्यायच नाही.
उद्धव ठाकरे त्यांना मातोश्रीच्या गेटजवळही येऊ देणार नाहीत. अजित पवारांजवळ राणा जाऊ शकत नाहीत. शिवसेना शिंदे गटाला राणा चालत नाही. शरद पवार यांनी राणा यांना आधीच आऊट केलं आहे. त्यामुळे देवाभाऊ शिवाय आपला वाली नाही, हे राणा यांच्या लक्षात आलं. परिणामी ते पुन्हा ‘देवाघरी’ परतले. जर फडणवीस यांनी भरपाई भरून काढू असं सांगितलं होतं तर राणा यांना नागपुरातून निघून जाण्याची गरजच नव्हती असं आता सांगण्यात येत आहे.
श्रद्धा, सबुरी अ्न Maturity
अनेकदा ठोकर लागल्यानंतरही शहाणे न होणाऱ्या राणा यांनी खरं तर आता ‘मॅच्युरिटी’नं वागायला हवं. उठसूठ प्रत्येकाशी पंगा अंगाशी येऊ शकतो. राजकारणात कोणी कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो, हे त्यांनी लक्षात घ्यावं. अमरावती लोकसभा आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर राणा यांनी खूप काही विकास केला असं अजिबात नाही. उलट विमानतळावी माजी खासदार नवनीत राणा यांनी ‘व्हिलचेअर’वर जो व्हिडीओ काढला त्यावर टीकाच झाली.
आजही अख्खं अमरावती राणा यांच्या विरोधात आहे. भाजपनं मनात आणलं असते तर राणा यांना बडनेऱ्यात विजय अवघड झाला असता. महायुतीमधील अनेक नेते आजही राणा यांच्या विरोधात आहेत. स्थानिक नेते बोलून दाखवितात. मुंबईतील नेते बोलत नाहीत, हाच काय तो फरक आहे. त्यामुळं आता एकत्र येत अमरावतीचा विकास करण्याचं जे शहाणपण राणा यांना सूचलं आहे, त्यावर त्यांनी खरोखर अंमलबजावणी करणं गरजेचं आहे.
आमदार होऊन होऊन मी कंटाळलो आहे असं राणा म्हणाले. त्यांना आणखी एका आमदाराचं उदाहरण द्यावंसं वाटतं. खामगावचे काँग्रेस नेते राणा दिलीपकुमार सानंदा. सानंदा यांना आयुष्यात एकदा तरी मंत्री व्हावं असं वाटतं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सानंदा यांची बरीच चलती होती. पण आजपर्यंत त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. ते देखील आमदार होऊन होऊन थकले आणि आता माजी आमदार म्हणून उरले आहेत. एका राणाची हीअवस्था पाहून दुसऱ्या राणानं शहाणं व्हावं.
आज नवनीत राणा यांच्या नावापुढं माजी असा शब्द लागला आहे. माजी हा शब्द राजकारणात प्रचंड वेदनादायी आहे. एकदा का तो नावामागे लागलं की गोचिडासारखा चिटकलेला राहतो. सुटता सुटत नाही. त्यामुळं राणाजी या माजी शब्दापासून जरा जपून पाऊल टाका. देवाभाऊ आहेत म्हणून उगाच काहीच्या काही करू नका. देवाभाऊ चांगले आहेत. प्रामाणिक आहेत यात शंकाच नाही. पण त्यांनाही त्यांच्या मंत्रिमंडळात भानगडी निर्माण करणारे मंत्री नको आहेत. त्यांना विकास करायचा आहे. राजकीय कुस्ती सोडवत बसायची नाही. नेत्यांचे वाद सोडविण्यात वेळ घालवत बसायचा नाही. त्यामुळं त्यांनी तुम्हाला सल्ला दिला होता. कमी बोलण्याचा आणि नीट वागण्याचा. तर त्यावर अंमल करून बघा. पाहा काही फायदा होतो का ते.