महाराष्ट्र

Ravikant Tupkar : दुधाने झुकवले सरकार, आता भाजीपालाही थांबवणार 

Farmers Protest : रविकांत तुपकर यांचा हुंकार; आठ दिवस थांबवा पुरवठा 

Author

शेतकऱ्यांच्या आंदोलनांचा चेहरा ठरलेले रवीकांत तुपकर पुन्हा जोशात आले आहेत. त्यांनी सरकारविरोधात निर्णायक कृतीसाठी शेतकऱ्यांना एकजूट होण्याचे आवाहन केले.

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अनेकदा सरकारला नमवणारा आवाज म्हणजे रवीकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. दूध दरवाढीसाठी मुंबई-पुण्यातील दूधपुरवठा बंद करून सरकारला झुकवणारे आणि हजारो शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवणारे हे नेतृत्व आता शेतकरी प्रश्नांवर निर्णायक लढाईच्या भूमिकेत दिसत आहे. पंढरपूरमध्ये छावा क्रांतिवीर सेनेच्या अकराव्या राष्ट्रीय महाअधिवेशनात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा प्रस्थापित व्यवस्थेला थेट इशारा दिला. ‘जर खरंच कर्जमाफी आणि हमीभाव हवाय, तर आठ दिवस मालपुरवठा थांबवा, सरकार तुमच्याच दारात येईल.’

तुपकर म्हणाले, काही वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही मुंबई-पुण्यात दूधपुरवठा थांबवला होता, तेव्हा सरकारला पाच रुपयांनी दरवाढ करावी लागली होती. तेव्हा आमचा नुसता इशारा पुरेसा होता. पण आता प्रश्न केवळ दूधाचा नाही, ऊसाचा आहे, सोयाबीनचा आहे. शेतकऱ्याच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापर्यंत पोहचले आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “जर खरंच सरकारला आपल्या मागण्या ऐकवायच्या असतील, तर फक्त घोषणा करून उपयोग नाही. आता कृती गरजेची आहे. मुंबईत जाणारा भाजीपाला, धान्य, फळं, सर्व शेतमाल आठ दिवस थांबवा. तेव्हा सरकार कशी झुकते ते बघा.

ग्रामीण वास्तव

तुपकर यांनी विदारक वास्तव मांडताना सांगितलं, आज परिस्थिती इतकी बिकट आहे की, सोयाबीन पट्ट्यातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. एवढी विषण्णता शेतकऱ्यांच्या आयुष्यात आहे. खरंतर शेतकरी संघटना बांधण्यापेक्षा अविवाहित शेतकऱ्यांची संघटना काढली, तर ती जास्त मोठी होईल. हा टोला केवळ विनोद नव्हता, तर राज्यातील ग्रामीण संकटाचं वास्तव उघड करणारं वाक्य होतं.

Nagpur : नाग नदीच्या भविष्यासाठी संकट

तुपकर यांनी शेतकरी संघटनांच्या एकतेवर भर दिला. ते म्हणाले, पूर्वी जेव्हा शेतकरी संघटना एकत्र होत्या, तेव्हा आमचा आंदोलनाचा इशारा कारखानदारांना घाबरायला भाग पाडायचा. पण आज गटबाजी, पक्षीय भांडणं यामुळे शेतकऱ्यांचं ऐक्य तुटलं आणि त्याचा फायदा कारखानदारांनी घेतला. संघटना कमकुवत असल्यामुळे ऊसदर मिळत नाही, कर्जमाफी मिळत नाही. त्यांनी स्पष्ट सांगितले की, पक्षीय झेंडे बाजूला ठेवा. आपण प्रथम शेतकरी आहोत. कोणत्याही बॅनरखाली काम करत असलो, तरी उद्दिष्ट एकच असलं पाहिजे शेतकऱ्याचं भलं.

एकजुटीने लढाई

तुपकर यांच्या मते, शेतकरी आणि कामगार यांची लढाई ही वेगळी नाही. महाराष्ट्रात जेव्हा शेतकरी आक्रमक झाले, तेव्हा त्याच सरकारला कर्जमाफी जाहीर करावी लागली होती. आंदोलनाचा दबाव असल्याशिवाय कोणतीही सत्ता झुकत नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. मागण्या करत बसण्यात वेळ घालवू नका, असा थेट सल्ला तुपकर यांनी दिला. राज्यातील सर्व शेतकरी जर खरंच एकत्र आले, तर कोणतीही सरकार त्यांच्यासमोर तग धरू शकत नाही. सरकारला झुकवायचं असेल, तर कृतीशील आंदोलन हाच एकमेव पर्याय आहे.

Parinay Fuke : ठाकरे गटाची मशाल विझवता- विझवता टेंबाच तुटणार वाटतंय 

रवीकांत तुपकर यांच्या भाषणात आजही जुन्या आंदोलनांची तीव्रता होती, पण त्यासोबत आजच्या काळातील वास्तवाचं भानही. एकीकडे त्यांनी जुन्या यशस्वी आंदोलनांची आठवण करून दिली, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या एकतेच्या अभावामुळे निर्माण झालेली वेदना व्यक्त केली. शेतकरीहितासाठी संघटनांची गरज, आक्रमक कृतीची तयारी आणि भूमिकेतील स्पष्टता, ही तुपकर यांच्या भाषणाची प्रमुख वैशिष्ट्यं ठरली. आता हे पाहावं लागेल की, रवीकांत तुपकर यांच्या हाकेला महाराष्ट्रातील शेतकरी कशी प्रतिसाद देतात आणि एक नवा जनआंदोलनाचा वणवा पेटतो का.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!