महाराष्ट्र

Ravikant Tupkar : ‘दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई’ मलकापूरात पेटली

Farmers Loan Waiver : सरकारच्या झोळीतून दिलासा कधी मिळणार?

Author

शेतकरी नेता रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मलकापूरात भव्य मोर्चा काढून थकित पिक विमा, कर्जमुक्ती आणि आयात-निर्यात धोरणात बदल यांसारख्या मागण्यांसाठी सरकारला चेतावणी दिली गेली.

महाराष्ट्राच्या मातीत शेतकऱ्यांचा संताप आता ज्वालामुखीसारखा उसळत आहे. सरकारच्या नाकर्तेपणाने आणि बेफिकिरीने बळीराजा हवालदिल झाला आहे. कर्जमाफी, पिक विमा आणि शेतमालाला योग्य भाव यांसारख्या मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शनिवार, ३० ऑगस्ट २०२५ रोजी मलकापूर येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. हजारो शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभाग घेत आपल्या हक्कांसाठी आवाज बुलंद केला. हा मोर्चा केवळ आंदोलन नव्हता, तर शेतकऱ्यांच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवणारा क्रांतीचा सूर होता.

मोर्चात शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीनच्या आयात-निर्यात धोरणात बदल, थकित पिक विम्याची त्वरित प्राप्ती, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, ज्वारी खरेदी सुरू करणे आणि विवरा गावातील सोलर कंपनीच्या अतिक्रमणामुळे बंद झालेला रस्ता मोकळा करणे यासारख्या मागण्या ठणकावून मांडल्या. शेतकऱ्यांचा हा संताप आता थांबणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. ही लढाई दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे, असे  म्हणत त्यांनी सरकारला खडसावले. शेतकऱ्यांचा हा लढा आता एका ठिणगीपासून वणव्यात बदलणार आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात दररोज सहापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्येच्या सावटाखाली आपले आयुष्य संपवत आहेत. तरीही महायुती सरकारला याची पर्वा नाही, असे चित्र आहे.

IPS Archit Chandak : बाप्पाच्या उत्सवात ‘प्रहार’ने केले गोवंश तस्करांचे ‘विसर्जन’

आयात-निर्यात धोरण बदलावे

निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन देणारे सरकार आता वरह जयंती आणि कबुतर उत्सवात मश्गूल आहेत असाही टोला लगावला जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र दुर्लक्षित राहत आहेत. तुपकर यांनी मोर्चाला संबोधित करताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कापसावरील आयात शुल्क हटवल्याने कापसाचे भाव गडगडणार आहेत. सरकारने तातडीने धोरणात बदल करून सोयाबीनची निर्यात वाढवावी, जेणेकरून शेतकऱ्यांना जास्त भाव मिळेल, असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे थकित पैसे त्वरित द्यावेत, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल. मलकापूरातील या मोर्चात मलकापूर तालुक्यासह आजूबाजूच्या गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

जनता चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला. शांततेच्या मार्गाने काढलेल्या या मोर्चाने प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. तुपकर यांनी प्रशासनाला उद्देशून सांगितले, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर आम्ही आंदोलन तीव्र करू. ही फक्त सुरुवात आहे, हा वणवा आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे. या मोर्चात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचा जाहीरनामा मांडला. थकीत पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, ज्वारीची खरेदी त्वरित सुरू व्हावी, कापूस आणि सोयाबीनच्या आयात-निर्यात धोरणात बदल व्हावा आणि शेतमजुरांना विमा संरक्षण मिळावे, अशा मागण्या प्रामुख्याने पुढे आल्या. याशिवाय, विवरा गावातील सोलर कंपनीने अतिक्रमण केलेला रस्ता मोकळा करावा, असाही आग्रह शेतकऱ्यांनी धरला. या मागण्यांसाठी शेतकरी एकजुटीने लढत असून, येत्या काळात हा लढा आणखी व्यापक होणार आहे.

Devendra Fadnavis : तात्कालिक आनंद नको, दीर्घकालीन न्याय हवा

रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हा क्रांतीचा वणवा आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा हा लढा सरकारला जागे करणार की पुन्हा एकदा बळीराजाचा आवाज दाबला जाणार, हे येणारा काळच ठरवेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!