महाराष्ट्र

Ajit Pawar : विकसित महाराष्ट्राचं भवितव्य सभागृहातून सुरू 

Monsoon Session : जनता बनणार महाराष्ट्राच्या उद्याची स्क्रिप्ट 

Post View : 16

Author

राज्याच्या भविष्यासाठी ‘विकसित महाराष्ट्र 2027’चं व्यापक व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली. जनतेच्या सहभागातून दिशा ठरवण्याचा संकल्प करत, राज्यभरात नागरिक सर्वेक्षण राबवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

राज्याच्या भविष्यासाठी एक ठोस, व्यापक आणि दूरदृष्टी असलेला आराखडा उभारण्याची सुरुवात आता जनतेच्या सहभागातून होणार आहे. महाराष्ट्राच्या उन्नतीचा नवीन अध्याय लिहिला जाणार असून, ‘विकसित महाराष्ट्र 2047’ या स्वप्नाचं वास्तवात रूपांतर करण्यासाठी राज्य शासनानं व्यापक आणि विधायक पावलं उचलली आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात माहिती देताना सांगितलं की, 6 मे 2025 पासून सुरू झालेल्या 150 दिवसांच्या विशेष अंमलबजावणी कार्यक्रमांतर्गत ‘विकसित महाराष्ट्र 2047’ करिता एक भव्य व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येणार आहे. या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये केवळ शासनाचीच भूमिका नाही, तर राज्यातील नागरिक, शेतकरी, उद्योजक, तरुण, महिला, कामगार, विद्यार्थी अशा प्रत्येक घटकाचं मत महत्त्वाचं आहे, अशी भूमिका शासनानं स्पष्ट केली आहे. त्यामुळे राज्यभर १८ जून ते १७ जुलै २०२५ दरम्यान नागरिक सर्वेक्षण राबवण्यात येत आहे.

चार आधारस्तंभ

या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी सरकारनं प्रगतीशीलता, शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि सुशासन हे चार भक्कम आधारस्तंभ निश्चित केले आहेत. या मूल्यांभोवती ‘विकसित महाराष्ट्र 2047’ हे स्वप्न उभं राहणार आहे. या व्हिजन डॉक्युमेंटची तयारी अधिक वैज्ञानिक आणि क्षेत्रनिहाय व्हावी म्हणून 16 स्वतंत्र क्षेत्रनिहाय गट स्थापन करण्यात आले आहेत. या गटांमार्फत शिक्षण, आरोग्य, रोजगार, पर्यावरण, उद्योग, शहरी व ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा यासह अनेक क्षेत्रांतील विशिष्ट उद्दिष्टे ठरवली जाणार आहेत.

अजित पवार यांनी सभागृहात स्पष्ट केलं की, विकसित महाराष्ट्रच्या दिशेने वाटचाल करताना राज्य शासनानं तीन टप्पे ठरवले आहेत. दीर्घकालीन उद्दिष्टे महाराष्ट्र 2047, 75 मध्यमकालीन उद्दिष्टे महाराष्ट्र , तात्काळ अल्पकालीन उद्दिष्टे. या त्रिसूत्रीच्या आधारे राज्यातील विविध योजना, धोरणं आणि विकास कार्यक्रम यांना दिशा मिळणार आहे.

Parinay Fuke : खत लिंकिंगचा तोडगा काढण्यासाठी आमदार झाले आक्रमक

सहभागाची मागणी

या सर्वेक्षणात प्रत्येक नागरिकाचा सहभाग अनिवार्य आहे, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतील सर्व सदस्यांना आवाहन केलं की, ते स्वतः मेळावे, सभा, बैठका आणि समाजमाध्यमांद्वारे नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावं. तसंच प्रत्येक जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका व इतर सरकारी यंत्रणांनी आपापल्या कार्यक्षेत्रात नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.

सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर एक विशेष QR कोड व लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या QR कोडवरून व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटद्वारे आपलं मत नोंदवता येईल. ही प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि सहजसाध्य ठेवण्यात आली आहे.

उभारणार राज्याचं भविष्य

‘विकसित महाराष्ट्र – 2047’ हा फक्त सरकारी प्रकल्प नाही, तर तो प्रत्येक मराठी माणसाचा, महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचा भविष्यदर्शी दस्तावेज असणार आहे. या व्हिजनमध्ये सामान्य माणसाचा आवाज, त्याच्या समस्या, स्वप्नं आणि अपेक्षा महत्त्वाच्या आहेत. या सर्वेक्षणात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं आणि महाराष्ट्राच्या भविष्याचा आराखडा स्वतःच्या मतांनी घडवावा, हीच या अभियानामागची खरी ताकद आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!