महाराष्ट्रातील शाळांमधील रिक्त शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. आरक्षणाचा तोडगा निकाली काढला जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिक्षकांसह विविध पदे रिक्त असल्याने शिक्षण व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देण्यासाठी शिक्षकांची कमतरता ही अडथळा ठरत आहे. तरीदेखील अद्याप राज्यात कोणतीही व्यापक शिक्षक भरती झालेली नाही. याच दरम्यान, भरती प्रक्रियेतील आरक्षणाच्या मुद्द्यावर तापलेल्या चर्चेत आता सकारात्मक हालचाल दिसू लागली आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट २०२५) दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील रिक्त पदांसाठी गठित केलेल्या समितीने नुकताच शासनाकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालाच्या आधारे आरक्षणासंबंधीचा मुद्दा लवकरच निकाली काढण्यात येणार असून, त्यानंतर भरती प्रक्रिया गतीने सुरू होईल. तातडीने रिक्त पदे भरण्यात येतील आणि आरक्षणाच्या नियमांनुसार क्रीडा, कला तसेच इतर विषयांचे शिक्षक यांना प्राधान्य दिले जाईल, असे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले. ही घोषणा त्यांनी चंद्रपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत केली.
Prashant Padole : खताच्या वाळवंटातून संघर्षाची मशाल पेटली दिल्ली दरबारात
आधार अपार कार्यशाळा
दादा भुसे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, ग्रामस्तरावरील शाळांना नियमित भेटी द्याव्यात. अशा भेटींमुळे स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेता येतात आणि त्या सहज सोडवता येतात, असे ते म्हणाले. शाळांना आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जातील. याशिवाय स्थानिक स्तरावर सी.एस.आर. फंड, खनिज विकास निधी आणि इतर स्त्रोतांचा वापर करून देखील शैक्षणिक सोयीसुविधा वाढवता येतील. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय देखील नियोजनाच्या टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळांची पटसंख्या वाढवणे ही काळाची गरज असल्याचे भुसे यांनी ठामपणे सांगितले. ‘आधार अपार’ या उपक्रमात अधिक काम करून शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे आदेशही त्यांनी दिले. सर्व शैक्षणिक कामे या महिन्याअखेरपर्यंत मार्गी लागली पाहिजेत, असा स्पष्ट संदेश शिक्षण मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला. या बैठकीदरम्यान विविध शिक्षक संघटनांनी भुसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यात शिक्षक भरती, सुविधा, तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेल्या विविध मागण्या मांडल्या गेल्या. बैठकीनंतर मंत्री भुसे यांनी गडचिरोलीहून चंद्रपूरकडे जाताना मूल तालुक्यातील आगडी आणि चिचपल्ली येथील जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला, त्यांच्या अभ्यासाबद्दल चौकशी केली आणि शाळेतील सोयी पाहिल्या.
Mahayuti : शेतकऱ्यांच्या आशांचा पालव, सरकारच्या कृतीने फुलणार