
पूर्णा नदीच्या पात्रात रात्रीच्या अंधारात सुरु होता ‘रेतीचे सोनं’ चोरायचा काळा खेळ. महसूल विभागाच्या वज्राघात कारवाईनं चार वाहने जप्त होताच तस्करांच्या साम्राज्यावर हादरा बसला.
मराठवाड्यातील वाळू माफियांना चपराक देत लोणार येथील महसूल विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. शनिवार 17 मे रोजी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर धडक कारवाई करत ती वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने ठोस पावले उचलल्याचे चित्र आहे.
राज्य शासनाने अद्यापही अधिकृत वाळू डेपो सुरू केलेले नसल्याने वाळू माफियांना मुबलक संधी मिळत आहे. याचाच गैरफायदा घेत मराठवाड्यातील पूर्णा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची अवैधरीत्या चोरटी वाहतूक सुरू आहे. या वाळूची विक्री नागरिकांकडून प्रचंड दराने केली जात असून शासनाचा लाखोंचा महसूल बुडवला जात आहे. पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू वाहतूक करणारे तस्कर बुलढाण्यातील लोणारमार्गे तसेच टिटवी, रायगाव, सावरगाव या आडमार्गांचा वापर करून अवैध वाळू वाहतूक करीत आहेत. विशेष म्हणजे ही वाहने बहुतांशी विनाक्रमांकाची असून रात्रीच्या वेळी शहरातून भरधाव जात असताना कोणताही बंदोबस्त नसल्याचे निदर्शनास येत आहे.

ठोस कारवाई
या धडक मोहिमेचे नेतृत्व तहसीलदार भूषण पाटील यांनी केले. त्यांच्या पथकात नायब तहसीलदार इप्पर, मंडळ अधिकारी सानप, तलाठी शेवाळे आणि कोतवालांचा समावेश होता. कारवाईदरम्यान चार वाहने ताब्यात घेण्यात आली असून ती लोणार पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. महसूल विभागाच्या या कठोर पावलामुळे वाळू माफियांना मोठा झटका बसला आहे. रात्रीच्या वेळेस होणारी ही अवैध वाहतूक थांबवण्यासाठी महसूल विभागाने पाऊल टाकले असले तरी पोलिस व परिवहन विभाग अजूनही गप्प का? अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. अनेक वाहने क्रमांकाशिवाय भरधाव वेगाने जात असताना वाहतूक आणि परिवहन विभाग हात का झटकतोय, असा सवाल उपस्थित होतो आहे.
नागरिकांची मागणी
वाळू तस्करी हा फक्त महसूल गमावण्याचा मुद्दा नसून पर्यावरण, कायदा-सुव्यवस्था, आणि स्थानिक जनतेच्या न्यायहक्कांशी निगडीत गंभीर प्रश्न आहे. शासनाने लवकरात लवकर वाळू डेपो सुरू करावेत आणि मोठ्या तस्करांवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी आता जनतेकडून जोर धरू लागली आहे. लोणार महसूल विभागाने घेतलेले हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र ही कारवाई केवळ एक दाखवण्यासाठीची मोहीम राहणार की या अवैध वाळू साम्राज्यावर मुळातून घाव घालण्यासाठीचा सुरूवात आहे, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.