
अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांना मिळतील 25 हजार रूपये बक्षीस. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाचा निर्णय.
देशातील रस्त्यांवर, महामार्गांवर अपघाताच्या घटना घडतच राहतात. एखादा अपघात झाला की इतर वाहनचालक तो अपघात पाहूनही दुर्लक्ष तेथून निघून जातात. बरेच लोकं आपला वेळ जाईल म्हणून अपघातात जखमी झालेल्या लोकांची मदतही करत नाहीत. पोलिस आपल्याकडेच चौकशी करत बसतील म्हणून काही लोकं अपघाताची माहिती देखील पोलिसांना देत नाहीत.
आपल्यालाच अपघाताच्या चौकशीचा मनःस्ताप सहन करावा लागेल. पोलिस आपल्यालाच या अपघातात अडकवतील, या भितीने लोक अपघातग्रस्तांची मदतच करत नाहीत. त्यामुळे लोकांची ही सवय बदलायला हवी. लोकांमध्ये अपघातग्रस्तांची मदत करायला प्रवृत्त करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अपघातग्रस्तांची मदत करायला नागरिकांना प्रेरित करण्यासाठी नितीन गडकरी यांनी हा निर्णय घेतला आहे. नितीन गडकरी म्हणाले की, रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्या लोकांना तत्काळ रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला केंद्र सरकार बक्षिसाची रक्कम 25 हजार रुपये करणार आहे. परंतु सध्या ही रक्कम पाच हजार रुपये इतकी आहे. बक्षिसाची रक्कममध्ये आता पाच पटींनी वाढ होणार असल्याचे गडकरींनी सांगितले. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांच्याबरोबर एका कार्यक्रमात रस्ते सुरक्षेबाबत ते बोलत होते.
Road Safety महत्वाची
देशात सुरक्षित प्रवासाला चालना मिळणे गरजेचे आहे. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळायला हवी. त्यांचे प्राण वाचवता आले पाहिजे. हे लक्षात घेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. नितीन गडकरी म्हणाले, वर्तमानात सुद्धा अशा प्रकारचं बक्षीस देण्यात येत आहे. पण त्या बक्षिसाची रक्कम सद्ध्या फार कमी आहे.
अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला पाच हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जात आहेत. रस्त्यावर अनेक जण अपघात पाहतात. एका तासाच्या आत अपघातग्रस्ताला रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला हे बक्षीस देण्यात येईल. रस्ते वाहतूक मंत्रालयाला बक्षिसाची रक्कम वाढविण्याचे निर्देश आपण दिल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
पोलिसांकडून दबाव
‘हिट अॅन्ड रन’ प्रकरण गडकरी म्हणाले की, पोलिसांना बऱ्याचदा साक्षीदार सापडण्यास अडचण निर्माण होते. पोलिसांना साक्षीदार म्हणून कोणी सापडत नाही. अशा स्थितीत ज्या व्यक्तीकडून पोलिसांना अपघाताची माहिती प्राप्त होते. त्या व्यक्तीलाच साक्षीदार बनविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येतो. रस्ते अपघातामधील पीडितांना मदत करणारे पोलिसांच्या कायदेशीर कार्यवाहीचा भाग बनतात. त्यामध्ये त्यांचा बराच वेळ जातो.
पोलिसांच्या चौकशीमुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या कारणाने अनेक लोक पोलिसांना अपघातांची माहिती सुद्धा देत नाहीत. काही घटनांमध्ये तर अपघातातील पीडितांची मदत करणाऱ्यालाच या अपघात प्रकरणात अडकविण्याची धमकी देऊन त्याला साक्षीदार बनविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येतो. या भितीने अनेकलोकं अपघातग्रस्तांची मदत करण्यास टाळतात.