
आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या अर्थखात्यात घुसखोरी करत असल्याचा आरोप केला.
महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून सर्व काही सुरळीत आहे असा सूर वरिष्ठ नेते सतत लावत आहे. नुकतेच उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्व काही बरोबर सुरू असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र एक वेगळंच चित्र समोर येत आहे. पालकमंत्र्यांच्या पदांपासून ते निधीच्या वाटपापर्यंत विविध मुद्द्यांवर तीनही घटक पक्षांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्यात घुसखोरी झाल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे ही घुसखोरी दुसऱ्या कुणाची नव्हे तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या आरोपाच्या निमित्ताने त्यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांवरही वेगवेगळ्या प्रकारे टीकेची झोड उठवली आहे. रोहित पवार यांचा दावा आहे की, मुख्यमंत्र्यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे पद निर्माण केले आहे. ज्याला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
मित्रपक्षांचा विश्वासघात
पद निर्माण करून, मुख्यमंत्री अर्थखात्यात प्रत्यक्षपणे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या नव्या सल्लागारामुळे आता अर्थखात्याचे धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री कार्यालयाच्या नियंत्रणात जातील, असे रोहित पवार म्हणाले. ते पुढे म्हणतात, गेल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी आधी एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये घुसखोरी केली होती. आता अजितदादांच्या अर्थखात्याची पाळंमुळंही आपल्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामागील उद्देश्य म्हणजे संपूर्ण सत्ताकेंद्रितता आणि प्रत्येक निर्णयावर आपलं वर्चस्व राखण्याचा मुख्यमंत्र्यांचा कट असल्याचे रोहित पवार यांचे मत आहे.
रोहित पवार यांनी अजून एक राजकीय शरसंधान सोडलं ते म्हणजे भाजपच्या कार्यपद्धतीवर. भाजपसाठी मित्रपक्ष म्हणजे फक्त एक तात्पुरती सोय आहे. गरज संपली की ही सोयही संपते, ही भाजपची ठरलेली पद्धत आहे, असं ते म्हणाले. त्यांनी असा आरोप केला की, भाजप आपल्या मित्रपक्षांना सुरुवातीला जवळ घेतं, पण वेळ आली की त्यांना बळीचा बकरा बनवतं. ते म्हणतात, ही कूटनीती सर्वसामान्यांना बाहेरून कळते, पण दुर्दैव म्हणजे जे पक्ष भाजपसोबत सत्तेत असतात त्यांना ही गोष्ट वेळेवर समजत नाही. जेव्हा समजते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे या धोरणांनी महायुतीतील अंतर्गत तणाव अधिकच वाढण्याची चिन्हं आहेत.
Praful Patel : भाईजींनी केलं महायुतीचा गेम करणाऱ्यांचे हौसले क्रॅश
कार्यशैली बदलण्याचा सल्ला
शेवटी, रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सल्ला दिला की लोकशाहीत सत्तेचं विकेंद्रीकरण आणि कार्यसंघ म्हणून काम करणे हेच राज्याच्या हिताचं ठरतं. एकाधिकारशाहीने राजकारण चालत नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की, त्यांनी आपली कार्यशैली बदलावी आणि सहयोगी, समन्वयात्मक मार्ग स्वीकारावा, जो महाराष्ट्राच्या हिताचा ठरेल. एकूणच, रोहित पवारांच्या प्रतिक्रियेने पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारातील तणाव चव्हाट्यावर आला आहे. आता भाजपकडून किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Harshawardhan Sapkal : संविधानाच्या नावावर ढोंगी आरत्या करणाऱ्यांना जळजळीत उत्तर