
महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापले असून आमदार संजय गायकवाड यांनी राज्य पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या विधानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला असताना, विरोधकांनी गायकवाड यांना समर्थन दिले आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड खळबळ माजली आहे. सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर थेट गंभीर आरोप केल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये मोठा वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड यांना फटकारले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी गायकवाडांच्या विधानाचे समर्थन करत वातावरण आणखी तापवले आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी राज्य पोलिस दलावर टीका करताना, महाराष्ट्र पोलिसांसारखा अकार्यक्षम विभाग जगात दुसरा कुठेही नाही, असे वक्तव्य केले. एवढेच नाही तर, पोलिस जर 50 लाख रुपयांचा माल पकडला, तरी ते केवळ 50 हजार दाखवतात आणि उरलेल्या रकमेचा अपहार करतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांच्या या विधानाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कठोर शब्दांत इशारा दिला होता की, असे बेजबाबदार वक्तव्य टाळावे.
फसवणुकीचा व्यवहार
संजय गायकवाड यांच्या विधानावर होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, विरोधी पक्षातील आमदार रोहित पवार यांनी उघडपणे गायकवाड यांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. पवार म्हणाले, गायकवाड जे बोलले ते खोटे नाही. त्यांच्याकडे माहिती असल्याशिवाय ते असे गंभीर आरोप केले नसते. जर 50 लाख रुपयांचा व्यवहार झाला असताना पोलिसांनी तो कमी दाखवला असेल, तर यामागे मोठे घोटाळे लपलेले असण्याची शक्यता आहे.
Devendra Fadnavis : ना घटनास्थळी, ना वास्तवात, वडेट्टीवारांवर घणाघात
त्यांनी नेरुळ ड्रग्ज प्रकरणाचा संदर्भ देताना सांगितले की, या प्रकरणात प्रत्यक्षात एक हजार 100ते एक हजार 200 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. पोलिसांनी त्याची चुकीची नोंद केली आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. मात्र प्रत्यक्ष व्यवहाराची रक्कम लपवली गेली. त्यामुळे पोलिस खात्यातील काही अधिकाऱ्यांची संलग्नता असल्याचा संशय बळावतो, असे रोहित पवार यांनी ठामपणे म्हटले. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना यामध्ये हस्तक्षेप करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
खोटे आश्वासन
पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी महायुती सरकारवर महिलांशी फसवणूक केल्याचा आरोपही केला. विधानसभा निवडणुकीत महायुतीने महिलांना दरमहा दोन हजार 100 रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. उलट राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी असा दावा केला की, दोन हजार 100 रुपये देण्याचे कोणतेही आश्वासन सरकारने दिले नव्हते. त्यामुळे महायुती सरकारने निवडणुकीपुरते महिलांचा वापर करून मतांसाठी आश्वासनांचे गाजर दाखवले आणि आता त्याची पूर्तता करण्यास टाळाटाळ केली, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
Vijay Wadettiwar : मंत्रालयातूनच करावा लागेल भ्रष्टाचाराचा खात्मा
संजय गायकवाड यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, मी केलेले विधान माझ्या वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. मी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण माझ्या विधानामागे मी ठाम आहे. गायकवाड पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तरीही, पोलिस खात्यातील गैरप्रकार उघड करण्याचा आपला उद्देश कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.