सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत बदल स्वीकारण्याची आणि जनतेकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. ज्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
देशाच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांचे अतूट नात हे काही नवीन नाही. संपूर्ण देशाला माहीत आहे, की सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील नाते एकमेकांना सशक्तपणे पूरक आहे. मात्र, सध्या या नात्यात काहीसा ताण जाणवू लागल्याचे दिसत आहे. मोहन भागवत यांनी अलीकडेच पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर अप्रत्यक्षपणे टीका केल्यामुळे राज्य आणि देशाच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. सरसंघचालकांच्या या अप्रत्यक्ष निशाण्याने राजकीय चर्चांना वेग दिला आहे.
शुक्रवारच्या एका (८ ऑगस्ट २०२५ रोजी) कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले, सगळे प्रयत्न संपले की लोक सर्वसामान्य जनतेकडे जातात. जनतेच्या मनात आले तर कामेही होते. पण जगात परिवर्तन होत आहे. हे ओळखून योग्य पाऊले उचलली नाहीत तर विनाश अटळ आहे. या विधानानंतर राजकीय मंडळींमध्ये गदारोळ पसरला आहे. भागवतांनी नागपूर येथील पाण्डुरंगेश्वर शिव मंदिरात आयोजित कार्यक्रमात शिवांच्या भक्तीचा संदर्भ देत महादेवाला सर्वसामान्यांचा प्रतीक म्हणून पाहिले. शिव हे लोकांचे प्रतिनिधित्व करतात. जेव्हा सगळे प्रयत्न अपयशी ठरतात, तेव्हा जनतेकडे पाहावे लागते.
राजकीय संघर्षाचा उगम
जगात परिवर्तन होत आहे. पण जर आपण त्या बदलांना जाणीवपूर्वक सामोरे गेलो नाही, तर विनाश होईल, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शिवात अपार सामर्थ्य असूनही तो वैराग्यशील आहे, विषही प्राशन करूनही जगाचे हित पाहतो. मात्र आताच्या काळात स्वार्थी वृत्ती वाढली असून लोकांना फक्त स्वतःच्या फायद्याचीच पर्वा आहे. शिवाचा स्वभाव असा नाही. त्यांच्याप्रमाणे साधेपणा आणि करुणा आपल्या जीवनात असायला हवी, असेही त्यांनी म्हटले. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यांनी अनेकांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावरील विश्वासाबाबत प्रश्न उभे केले आहेत. काही विरोधकांनी याचा अर्थ मोदींच्या राजकीय कारकीर्दीवर निशाणा साधल्याचा दावा केला आहे.
भागवत यांनी याआधीच मोदींच्या ७५ वर्षांच्या वयावरुन राजकारणातून निवृत्ती होण्याची शक्यता सूचवली होती. ज्यामुळे चर्चांना अजून उग्रता मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वीच भागवत यांनी हिंदू धर्मातील विविधतेचा स्वीकार आणि एकतेचा संदेश देत जागतिक स्तरावर हिंदू धर्माची गरज असल्याचे मत मांडले होते. धर्म आपल्याला एकतेची भावना शिकवतो, विविधतेत एकात्मता कशी राखायची हे समजावतो. संकटाच्या काळात धर्म आपल्याला धैर्य देतो, असे ते म्हणाले. राजकारणाच्या या नाजूक टप्प्यावर, सरसंघ चालक आणि पंतप्रधान यांच्यातील हा अप्रत्यक्ष संघर्ष आगामी काळात कसा रंगणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या संवादातून पुढील राजकीय वाटचालीला नव्या वळणाचा लाभ होऊ शकतो किंवा तो आणखी गडद होऊ शकतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Snehal Ramteke : चंद्रपूरच्या शहर अध्यक्षपदी वंचितांचा नवा चेहरा