
द लोकहित लाईव्हच्या सातत्यपूर्ण बातम्यांमुळे अकोल्याच्या वीज समस्येकडे लक्ष वेधलं गेलं आहे. आता आमदार साजिद खान पठाण यांनी आक्रमक भूमिका घेत थेट अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.
अकोला शहरात गेली अनेक वर्षे वीजपुरवठ्याचा खेलखंडोबा सुरू आहे. कमी वोल्टेज, अनियंत्रित लोडशेडिंग, सतत खंडित होणारा वीज पुरवठा, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या सर्व गोंधळात भर म्हणजे महावितरणच्या अधिकाऱ्यांची बेफिकिरी! या सगळ्यांनी अकोला जिल्ह्याची ‘विकासदृष्ट्या दरिद्री’ अशी प्रतिमा तयार केली आहे. या सर्व गंभीर समस्यांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या ‘द लोकहित लाईव्ह’ या लोकाभिमुख माध्यम संस्थेच्या सातत्यपूर्ण वृत्तांकनामुळे अखेर अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांना मैदानात उतरून आक्रमक भूमिका घ्यावी लागली आहे.

20 मे मंगळवार, दुपारी 2 वाजता, आमदार साजिद खान पठाण यांनी थेट दुर्गा चौक येथील विद्युत भवनाला धडक दिली. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून खुलासा मागितला. सामान्य जनतेच्या मनातील संताप आणि द लोकहित लाईव्हच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर ही ठोस कारवाई झाली आहे. शहरात सुरू असलेल्या अघोषित भारनियमनाविरोधात आमदार साजिद खान पठाण यांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरणला तातडीने उपाययोजना करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. समस्येची त्वरित दखल न घेतल्यास महावितरणच्या कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
Bhushan Gavai : सरन्यायाधीशांच्या अपमानावर नाना पटोले राष्ट्रपतींच्या दरबारी
तीव्र नाराजी
अकोला शहरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. व्होल्टेजच्या तक्रारी, पाण्याच्या नळांच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होणे, रुग्णालय परिसरातही भारनियमन होणे यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणी आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांसाठी देखील त्रास सहन करावा लागत आहे. अघोषित लोडशेडिंगने जनतेला वेठीस धरले जात आहे. हे प्रश्न केवळ माझ्या मतदारसंघापुरते मर्यादित नसून संपूर्ण शहराला भेडसावत आहेत, असे म्हणत आमदार पठाण यांनी अधीक्षक अभियंता अजितपाल दिनोरे यांच्यासमोर संताप व्यक्त केला. मेंटेनन्सच्या नावाखाली अचानक वीजपुरवठा खंडित केला जातो. परंतु नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही, यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
साजिद खान पठाण यांनी ठणकावून सांगितले की, मेंटेनन्सपूर्वी संबंधित परिसरातील नागरिकांना सूचना द्याव्यात. स्थानिक स्तरावर तक्रार नोंदविण्याची यंत्रणा उभारण्यात यावी. शहरातील व्होल्टेजची अडचण तातडीने सोडवावी. या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजे अन्यथा महावितरणच्या कार्यालयाचीच वीज बंद करू, असा इशारा आमदार पठाण यांनी दिला आहे. नागरिकांना अघोषित भारनियमनाचा त्रास काय असतो, हे अधिकाऱ्यांनाही समजावून द्यावे लागेल. वेळेवर उपाय न झाल्यास महावितरणच्या कार्यालयाचीच वीज बंद करून आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा आमदार पठाण यांनी दिला.
लोकप्रतिनिधींचा अपयश
अकोल्यातील लोकप्रतिनिधी कितीही आंदोलने, पत्रव्यवहार, आणि पत्रकार परिषदांचे तासन्तास प्रयोग करत असले तरी महावितरणचे अधिकारी आता ऐकायलाच तयार नाहीत, असे दृश्य आहे. पण जेव्हा द लोकहित लाईव्ह ने सातत्याने शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे वास्तव समोर आणले आहे. नागरिकांच्या भावना, संतप्त प्रतिक्रिया आणि रात्रभर अंधारात घालवलेले क्षण एका पाठोपाठ एक वृत्तांद्वारे मांडले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेला अंडरपास आणि उड्डाणपूल सुद्धा योग्य देखरेखीअभावी निष्पर्ण ठरला. अंडरपासमध्ये पाणी साचून ‘गटारगंगा’ झाली. नितीन गडकरींनी दिलेल्या विकास कामांवर देखील अधिकारी दुर्लक्ष करतात. अशोक वाटिका येथील उड्डाणपूल निर्माण होताच कोसळण्याच्या परिस्थितीत होता. त्यामुळे उड्डाणपुलाचा काही भाग बंद करून पुन्हा दुरुस्ती करावा लागला. हे सगळं देखील द लोकहित लाईव्हच्या कॅमेऱ्यातून प्रामाणिकपणे लोकांसमोर आले.
निर्भीड भूमिका
आमदार साजिद खान पठाण यांनी थेट विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत खडसावले आहे. पण हे आंदोलन, हे रोष, आणि ही धडक कारवाई एका रात्रीत घडलेली नाही. या मागे आहे ‘द लोकहित लाईव्ह’च्या सततच्या बातम्यांची साखळी. जी दिवसेंदिवस महावितरणच्या गलथान कारभारावर बोट ठेवत गेली.
अकोला शहराला नेहमीच विकासाच्या बाबतीत वाऱ्यावर सोडलं गेलंय. पण द लोकहित लाईव्ह ने हा अन्याय सहन केला नाही. यांनी लोकांच्या आवाजाला माध्यम बनवलं, प्रश्नांना व्यासपीठ दिलं आणि आता त्या आवाजामुळे आमदारांना प्रत्यक्ष कारवाई करावी लागली आहे. आता महावितरण या गंभीर इशाऱ्याची दखल घेऊन उपाययोजना करते की आंदोलनाची वेळ येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.