
डाबकी रोडवर सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामाची आमदार साजिद खान पठाण यांनी पाहणी केली. नागरिकांच्या तक्रारींवर गंभीर दखल घेत त्यांनी अधिकाऱ्यांना दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघातील डाबकी रोड रुंदीकरणाचे काम तपासणीसाठी 21 मे बुधवारी आमदार साजिद खान पठाण यांनी भेट दिली. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत, कामात सुधारणा करणे आणि दर्जेदार बांधकाम सुनिश्चित करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना दिले.

या दौऱ्यात स्थानिक नागरिकांनी साचणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून ते नाल्यांमधील अडथळ्यांपर्यंत अनेक समस्या आमदार पठाण यांच्यासमोर मांडल्या. त्यांच्या मागण्या ऐकून घेत पठाण यांनी मनपा अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांना काम चांगलेच झाले पाहिजे, कारण हे जनतेचे पैसे आहेत, असा स्पष्ट इशारा दिला. यावेळी मनपाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, शैलेश चोपडे, कंत्राटदार संजय अग्रवाल, जावेद जकारिया यांच्यासह काँग्रेस व शिवसेना (शिंदे गट) चे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युद्धपातळीवर तयारीचे आदेश
येत्या 4 जून रोजी संत गजानन महाराज पालखी पंढरपूरकडे प्रयाण करणार आहे. या पालखी अकोल्यातील पारंपरिक मार्ग डाबकी रोड असल्याने सद्यस्थितीत सुरू असलेल्या रुंदीकरण कामामुळे हा रस्ता खोदलेला आहे. यामुळे पालखीच्या स्वागतास अडथळा येऊ नये, म्हणून आमदार पठाण यांनी ‘डागडुजी युद्धपातळीवर करा, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्या,’ असे स्पष्ट निर्देश दिले.
गेल्या काही वर्षांत अकोल्यात अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रिट रस्त्यांमध्ये दिसलेल्या अनियमितता, नव्याने झालेले उड्डाणपूल आणि अंडरपासमधील समस्या लक्षात घेता, आमदार पठाण यांनी यावेळी ठाम भूमिका घेतली. पूर्वीही लाखो-कोट्यवधी रुपये खर्चून झालेली कामे अपूर्ण किंवा निकृष्ट झाल्याची उदाहरणं आहेत. यावेळी ती चूक पुन्हा होऊ नये, असा निर्वाळा देत त्यांनी उपस्थित यंत्रणेला जबाबदारीची जाणीव करून दिली. डाबकी रोडवरील या रस्त्याच्या विकासाला भाजपचे नेतृत्व असताना मंजुरी मिळाली होती. त्यामुळे यावरून सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई देखील सुरू आहे.
या पाहणी दौऱ्याचे विशेषत्व म्हणजे स्थानिकांचा मोठा सहभाग. अनेकांनी समस्यांचे मुद्देसूद सादरीकरण करत आमदाराशी थेट संवाद साधला. नागरिकांचा विश्वास आणि अपेक्षांवर खरे उतरायचे असल्याची जाणीव ठेवून आमदार पठाण यांनी स्पष्ट केले की, दर्जेदार विकासकामे आणि पारदर्शक प्रशासन हीच माझी प्राथमिकता राहणार आहे. डाबकी रोडचे काम केवळ तांत्रिकदृष्ट्या नव्हे, तर सार्वजनिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे. हे काम केवळ रस्ता रुंदीकरणापुरते मर्यादित न ठेवता, त्याद्वारे अकोल्याच्या अविकसित भागातील विकासाला गती देणारी कृती ठरावी, अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.