संपादकीय/लेख

प्रशासन राज येताच Salil Deshmukh चिडले; नागपूर झेडपी प्रशासनाशी भिडले

थांबलेल्या कामांच्या Work Order साठी ठिय्या आंदोलन

Post View : 25

Author

नागपूर जिल्हा परिषदेत प्रशासक राज येताच राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. सलील देशमुख यांनी झेडपी कार्यालयापुढं कामांसाठी ठिय्या दिला.

आतापर्यंत काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेत प्रशासक राज येताच महाविकास आघाडी आक्रमक झालेली बघायला मिळत आहे. कामं होत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख आक्रमक झाले आहेत. कामाला मंजुरी मिळाली. परंतु वर्क ऑर्डर नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळं देशमुख यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नागपूर जिल्हा परिषदेपुढं ठिय्या आंदोलन केलं. विशेष म्हणजे काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार यांचं वर्चस्व असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेत आतापर्यंत महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होता. काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपला. त्यामुळं येथे प्रशासक नियुक्त करण्यात आला. प्रशासक राज येताच देशमुख यांना आपली कामं अडली आहेत, याची जाणीव झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे.

नागपूर जिल्हा परिषदेत प्रशासक राज आल्यानंतर सलील अनिल देशमुख यांनी वर्क ऑर्डर मिळत नसल्याचा आरोप केला. राज्यातील महायुती सरकार कामं थांबवित असल्याचा त्यांचा दावा आहे. विशेष म्हणजे ज्या 20 कोटी रुपयांच्या कामांसाठी देशमुख आंदोलन करीत आहेत, ती कामं जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता असतानाच मंजूर झाली आहेत. मात्र प्रशासक राज आल्यानंतर देशमुख यांनी आंदोलन सुरू केलं. काही दिवसांपूर्वी त्यांचे वडील तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असेच दोषारोप सुरू केले होते. लोकसभा व विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर त्यांनी शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. तसाच प्रकार सलील देशमुख यांनी केल्याची चर्चा नागपूरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दोन कोटींच्या कामाची Salil Deshmukh यांना हवी वर्क ऑर्डर

आमदारावर रोष

अनिल देशमुख यांनी आमदार असताना मतदारसंघात कामं मंजूर करून घेतली होती. मात्र भाजपचे विद्यमान आमदार चरणसिंह ठाकूर यांनी कामं थांबविल्याचा दावा सलील देशमुख यांनी केलाअ आहे. काटोल मतदारसंघातील ही कामं आहेत. काटोल मतदारसंघावर आतापर्यंत अनिल देशमुख गटाचं वर्चस्व होतं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र देशमुख यांनी सुपुत्र सलील देशमुख यांना उमेदवारी मिळवून दिली होती. निवडणुकीत सलील यांचा पराभव झाला. आता देशमुख ठाकूर यांच्यावर कामं अडविल्याचा आरोप करीत आहेत. त्यामुळं देशमुख आमदार असताना मंजूर झालेली कामं आतापर्यंत पूर्ण का झाली नाहीत? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

निवडणूक जिंकल्यानंतर ठाकूर यांनी अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात मंजूर विकास कामे रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. चरणसिंह ठाकूर यांनी यासंदर्भात पत्र व्यवहारही केला आहे. देशमुख यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात पंतप्रधान खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत सुमारे 20 कोटींची कामे मंजूर करून घेतली होती. मात्र ही कामं इतकी दिवस प्रलंबित का ठेवण्यात आली असा मुद्दा उपस्थित होत आहे.

निधी वितरणाचे आदेशही देण्यात आले. मग वर्क ऑर्डर का थांबली हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. विशेष म्हणजे या सर्व मुद्द्यावर सलील देशमुख यांनी आता आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलन करताना सलील देशमुख यांनी मतदारसंघातील मंजूर कामे रद्द करून काय साध्य करणार असा प्रश्न केला. अशा प्रकारचे राजकारण योग्य नाही. विकासाची कामं थांबल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सलील देशमुख यांनी यावेळी दिला. त्यामुळं देशमुखांची आधीच मंजूर असलेली कामं कोण थांबवत आहे. काँग्रेस, भाजप की प्रशासक याचा शोध घेणं गरजेचं आहे.

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

मातृभूमी (अकाेला), सकाळ (अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती), दैनिक भास्कर हिंदी (मराठवाडा वृत्त विभाग प्रमुख) , महाराट्र टाइम्स (नागपूर), भास्कर समूहाचे मराठी दैनिक दिव्य मराठी (अमरावती), सकाळ माध्यम समूहाचे पॉलिटिकल वेब पोर्टल सरकारनामा असा प्रसन्न यांचा पत्रकारितेचा सुमारे 26 वर्षांचा प्रवास आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते प्रसन्न यांचा शोध प्रबंध भुवनेश्वर येथील भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रकाशित करण्यात आला. क्राइम रिपोर्टिंग पासून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रसन्न यांनी गडचिरोली, छत्तीसगडमधील बक्स, अबुजमाड या नक्षलवाद्यांची भीषण दहशत असलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील अनेक निवडणुकीचे रिपोर्टिंगही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (सिमी) आणि दिनदार-ए-अंजुमन या दोन प्रतिबंधित संघटनांचे नेटवर्क उद्ध््वस्त करणारे रिपोर्टिंगही त्यांनी केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याकुब मेमन याच्या फाशीच्या घटनेचे ‘ऑन द स्पॉट’ आणि कुठेही न प्रकाशित झालेले वार्तांकनही त्यांनी नागपूर येथे केले.

More Posts

Follow Me:Add me on XAdd me on Facebook

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!