नागपूरचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख समीर शिंदे वेठबिगार कामगारांच्या हक्कांसाठी स्थापन झालेल्या विशेष समितीवर नियुक्त झाले आहेत.
नागपूरच्या मातीत रुजलेला एक आवाज, जो गेल्या अनेक वर्षांपासून उपराजधानीच्या रस्त्यांवरून प्रशासनाच्या दरबारापर्यंत गूंजतोय, तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख समीर शिंदे. सामान्य माणसाच्या अडचणींना वाचा फोडणारे नेता पुन्हा एकदा चर्चेत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांपासून ते नागरिकांच्या हक्कांपर्यंत, समीर शिंदे यांनी प्रत्येक मुद्द्यावर ठामपणे लढा दिला आहे. त्यांच्या या चिकाटीमुळे आणि निष्ठेने ते नागपूरकरांच्या मनात एक विश्वासू आणि कर्तबगार नेते म्हणून ओळखले जातात. आता, त्यांच्या या कार्याला एक नवी दिशा मिळाली आहे.
वेठबिगार प्रथेतून कामगारांची सुटका करण्यासाठी स्थापन झालेल्या विशेष समितीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. यामुळे नागपूरच्या सामाजिक क्षेत्रात एक नवा आशेचा किरण पसरला आहे. सध्या नागपूर शहरात ऑनलाइन डिलिव्हरी ॲप्सचा बोलबाला आहे. ॲमेझॉन, स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट यांसारख्या कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय रस्त्यांवर घरपोच सेवा देताना दिसतात. पण या सेवेच्या मागे लपलेली वास्तविकता धक्कादायक आहे. डिलिव्हरी बॉयच्या पाठीवर लटकणारी बॅग इतकी जड असते की, ती एखाद्या बैलालाही सहन होणार नाही. या जड बॅगांमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. पण त्यांना योग्य पगार, विमा, किंवा वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत.
Parinay Fuke : खेळ जिंकला खास, पण श्रेय महायुतीच्या नावावर पास
कामगारांचे हक्क सुरक्षित
रोजंदारी मजुर प्रमाणे त्यांच्याकडून काम करवून घेतले जाते. यातूनच त्यांच्यावर अन्याय होतो. समीर शिंदे यांनी या मुद्द्याला हात घातला आहे. कामगारांवर अन्याय सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या या धडाडीच्या भूमिकेमुळे डिलिव्हरी बॉयसह इतर वेठबिगार कामगारांना आशेचा किरण दिसू लागला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समीर शिंदे यांच्या नियुक्तीची घोषणा करताना त्यांचे कौतुक केले. त्यांनी पत्रात लिहिले, समाजातील शोषित आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी तुमची सामाजिक जाण आणि अनुभव मोलाचा ठरेल. ही जबाबदारी तुम्ही नक्कीच यशस्वीपणे पार पाडाल.
समीर शिंदे यांचा यापूर्वीचा रेकॉर्डही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतो. त्यांनी मांडलेल्या अनेक तक्रारींवर शासनाने तातडीने कारवाई केली. नागपूरकरांच्या अनेक समस्यांना तोडगा निघाला. आता या नव्या समितीच्या माध्यमातून ते वेठबिगार कामगारांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत.ही समिती केवळ कागदोपत्री राहणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहील, असा विश्वास समीर शिंदे यांनी व्यक्त केला आहे. डिलिव्हरी बॉयच्या पाठीवरचे ओझे कमी करणे, त्यांना योग्य पगार, विमा, आणि वैद्यकीय सुविधा मिळवून देणे, यासाठी ते कटिबद्ध आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे नागपूरच्या रस्त्यांवर धावणाऱ्या डिलिव्हरी बॉयना केवळ पार्सलच नव्हे, तर न्याय आणि सन्मानही मिळेल, अशी आशा आहे.
