संजय गायकवाड आणि इम्तियाज जलील यांच्यातील शाब्दिक युद्ध आता थेट ‘Fight Club’च्या रिंगणात उतरलं आहे. गायकवाडांनी स्टॅम्प पेपरवर लढाईचा करार लिहून जलीलला थेट आझाद मैदानावर भिडायला खुलं आव्हान दिलं आहे.
राजकीय चर्चांमध्ये नेहमीच चर्चेत राहणारे आणि वादग्रस्त विधानांच्या जोरावर प्रकाशझोतात येणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा प्रचंड वादात अडकले आहेत. कधी शिवीगाळ, कधी बेधडक कृती, कधी थेट मारहाणीचे व्हिडिओ, त्यांच्या नावाभोवती सतत खळबळ असतेच. पण यावेळी त्यांनी सगळ्याच मर्यादा ओलांडत थेट लढाईचं उघड आव्हान दिलं आहे. तेही 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कायदेशीर करार करून.
सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली ती आमदार निवासातील कॅन्टीनमधून. गायकवाड यांनी शिळं अन्न दिलं गेल्याचा राग येऊन थेट कॅन्टीन चालकाला बेदम मारहाण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि विरोधकांसह सर्वसामान्य जनतेनेही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. यावर प्रतिक्रिया देताना एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, मी त्या कॅन्टीनवाल्याच्या जागी असतो, तर गायकवाडांचीच धुलाई केली असती आणि इथून पुढे सगळा खेळ सुरू झाला.
करार करून पाठविला
गायकवाडांनीही पलटवार करत म्हटलं, तो जर कॅन्टीन चालक असता, तरी त्यालाही चोप दिला असता. या वाक्यानंतर जलील यांनी थेट सिनेमात शोभेल असं उत्तर दिलं. ‘जगह तेरी, दिन तेरा, वक्त भी तेरा.. आजा, कहां लढना है? आणि प्रकरण एका वेगळ्याच वळणावर पोहोचलं. या आव्हानाला अधिक ‘कायदेशीर’ रूप देत संजय गायकवाड यांनी थेट स्टॅम्प पेपरवर करार लिहून जलील यांना पाठवला आहे. या करारात त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की, ही लढाई हातात हात, मुठीत मुठ ठेवून होईल. कोणतंही शस्त्र, दगड, काठी वापरणार नाही. तिसरा कोणीच मध्ये येणार नाही. जर काही बरेवाईट झालं, तर जबाबदारी दोघांची असेल. एवढंच नाही, तर या लढाईची तारीख, वेळ आणि स्थळ ठरवण्याची मुभा इम्तियाज जलील यांनाच दिली आहे.
लोकशाहीची लाज
या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच हलकल्लोळ माजला आहे. सोशल मीडियावर दोघांच्या ‘रिंगण’ युद्धाची चर्चा रंगली आहे. काहीजण याला राजकीय नौटंकी म्हणत आहेत, तर काही जण म्हणतात की, लोकशाहीची लाज वाटतेय. पण जनता आता एवढंच विचारते की, इम्तियाज जलील खरंच हे आव्हान स्वीकारणार का? की ते गायकवाडांच्या या स्टंटवर मौन बाळगणार?
संजय गायकवाड यांच्यासाठी ही काही पहिली वेळ नाही. त्यांचा वादग्रस्त राजकीय इतिहास मोठा आहे. पण यावेळी त्यांनी थेट Fight Club स्टाईलने करार करून एक वेगळंच उदाहरण उभं केलं आहे. अशा पद्धतीच्या पातळीवर नेत्यांमधला संघर्ष पोहोचणं ही लोकशाहीसाठी अतिशय चिंताजनक बाब आहे.
राजकारणातील अशा राडेबाज वळणांनी मतदारांचा विश्वास आणि अपेक्षांचा चक्काचूर होत आहे. कारण जनता आशा करत असते की, त्यांचे प्रतिनिधी संवादातून प्रश्न सोडवतील, पण इथे तर थेट चोप देण्याच्या घोषणा, आणि तीही स्टॅम्प पेपरवर. आता इम्तियाज जलील यांचा पुढचा पाऊल काय असेल? लढणार की दुर्लक्ष करणार? हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट की, महाराष्ट्राच्या राजकारणात असा ‘Fight Agreement’ पहिल्यांदाच पाहायला मिळतोय.