
ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी भाषणात छत्रपती संभाजीराजे व शिवरायांबद्दल अपमानास्पद शब्द वापरले. त्यांच्या विधानामुळे राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून राजकीय वातावरण तापलं आहे.
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे बंधूंच्या संयुक्त मेळाव्यानंतर बोलताना त्यांनी मराठी भाषा, बहुभाषिकता आणि इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांचा संदर्भ देत अनेक संतापजनक विधानं केली. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वापरलेल्या अपशब्दांमुळे संजय गायकवाड यांच्यावर तुफान टीका होत आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे सरकारच्या त्रिभाषा धोरणाविरोधात आवाज उठवला होता. या आंदोलनानंतर सरकारने निर्णय मागे घेतला. मराठी जनतेच्या दबावामुळे हा विजय मिळाल्याचे सांगत ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला. 18 वर्षांनंतर दोघे एकत्र आले. याच पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांनी आपल्या भाषणातून वादाचा धुराळा उडवला.

Prakash Ambedkar : मराठी प्रेमाचं नाट्य की नव्या राजकारणाची साक्ष?
संतापजनक भाषा
संजय गायकवाड यांनी भाषेच्या महत्त्वावर भाष्य करत असताना छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, बहुभाषिक असणे ही गरज आहे. इतिहासातील अनेक थोर नेत्यांनी विविध भाषा शिकल्या होत्या. जिजाऊ, ताराराणी आणि येसूबाई यांनीही अनेक भाषा आत्मसात केल्या होत्या, असे सांगत त्यांनी अशा व्यक्तिमत्त्वांविषयी असभ्य शब्द वापरले.
संजय गायकवाड यांच्या विधानात ‘मूर्ख’ या शब्दाचा वापर झाल्यामुळे, राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. या शब्दांनी केवळ छत्रपती घराण्याचाच नव्हे, तर संपूर्ण मराठी अस्मितेचा अपमान झाल्याचा आरोप विरोधकांनी आणि सामाजिक संघटनांनी केला.
Vijay Wadettiwar : छत्रपतींच्या अपमानावरून शिवसेनेवर संतापाची लाट
ठाकरे बंधूंवर प्रहार
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या राजकीय परिणामांवर भाष्य करताना संजय गायकवाड यांनी ठाकरे नावाचा ब्रँड संपल्याचा दावा केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून उद्धव ठाकरे दूर गेल्यामुळे आज शिवसेना कमजोर झाली आहे, असे मत त्यांनी मांडले.
गायकवाड म्हणाले की, जर ठाकरे ब्रँडमध्ये ताकद असती तर बाळासाहेबांच्या काळातच संपूर्ण राज्यावर त्यांचा झेंडा फडकलाच असता. पण प्रत्यक्षात शिवसेनेला 70 ते 74 जागांपलीकडे यश मिळालं नाही. त्यामुळे आज उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र आल्याने फारसा राजकीय फरक पडणार नाही, अशी रोखठोक टीका त्यांनी केली.
भाषिक संवेदनांवर घसरण
मराठी माणसाने इतर भाषाही शिकायला हव्यात, असे मत मांडताना संजय गायकवाड यांनी उर्दू भाषेचे समर्थन केले. पाकिस्तानचा दहशतवाद ओळखण्यासाठी आणि रोखण्यासाठी उर्दू भाषा शिकणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
वक्तव्याच्या शेवटी त्यांनी मराठीचा अपमान करणाऱ्यांविषयी आक्रमक भाषा वापरली. महाराष्ट्रात राहून मराठी बोलायला लाजणाऱ्यांना जबाबदारीने वागायला हवे, असे म्हणताना त्यांनी ‘थोबाड फोडा’ सारखी भाषा वापरून अधिकच वाद उभा केला. त्यांच्या भाषणाची ही शैली जनतेच्या मनात तीव्र प्रतिक्रिया निर्माण करणारी ठरली.
संजय गायकवाड यांच्या विधानामुळे राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. ऐतिहासिक नेत्यांविषयी वापरलेली भाषा आणि ठाकरे कुटुंबावर केलेल्या टिप्पणींमुळे त्यांच्यावर टीकास्त्र सुरु झाले आहे. सामाजिक संघटनांनी त्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.