महाराष्ट्र

Sanjay Raut : मोदींचे अवतारकार्य संपले, आता निवृत्ती घ्या

Maharashtra : भाजप चालवतेय मुगल संस्कृती 

Author

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य निवृत्तीची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी मोदींनीच तयार केलेल्या 75 वर्षांच्या नियमाची आठवण करून देत, आता त्यांनाही नियम पाळावा लागेल, असा दावा केला आहे.

भारतीय राजकारणात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संभाव्य निवृत्तीची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तिखट शब्दांत टीका केली आहे. मोदी यांनीच वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नेत्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता स्वतः नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षांचे होत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या तयार केलेल्या नियमाप्रमाणे निवृत्त व्हावे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना लालकृष्ण आडवाणींचा मुद्दा उपस्थित केला. लालकृष्ण आडवाणी हे भाजपचे आधारस्तंभ होते. त्यांनी पक्षाला दोन जागांवरून सत्तेच्या शिखरावर नेले. अयोध्या आंदोलनासारखी मोठी चळवळ उभारली. पण त्यांनाच मुगल संस्कृतीप्रमाणे शहाजहाँसारखे सत्तेपासून दूर ठेवले गेले. भाजपने त्यांना मार्गदर्शक मंडळात टाकून अप्रत्यक्षपणे राजकीय निवृत्ती द्यायचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

राऊतांचा सवाल

राऊत पुढे म्हणाले की, जेव्हा भाजपनेच आडवाणींना सत्तेपासून बेदखल केले, तेव्हा कोणी विचारले का की हे मुगल संस्कृती आहे का? मोदींनी राजकीय स्वार्थासाठी त्यांना बाजूला केले आणि स्वतः दोन वेळा पंतप्रधान झाले. आता आम्ही विचारतो की मोदींच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केल्यावर त्याला मुगल संस्कृती कसे म्हणता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राम आणि कृष्ण यांनी देखील त्यांचे अवतारकार्य पूर्ण केल्यानंतर पृथ्वी सोडली. नरेंद्र मोदी हे देखील स्वतःला एक विशिष्ट कार्यासाठी आलेला नेता मानतात, मग त्यांचे कार्य संपले आहे का नाही? आता त्यांनीही निवृत्त व्हावे, असे खोचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना वारसदार ठरवला जात नाही, असे विधान केले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले, कोण बाप आणि कोण वारसदार? मोदी हे पंतप्रधान आहेत, एक तात्पुरती व्यवस्था आहे. पंतप्रधान हे कोणीही होऊ शकतात. भाजप आणि संघाने यावर निर्णय घ्यायचा आहे, पण त्याचा आम्ही बारीक अभ्यास करतो आहोत.

भाजपचा वारसदार

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी 11 वर्षांत प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेले होते. या भेटीत सरसंघचालक मोहन भागवत आणि मोदी यांच्यात त्यांच्या निवृत्तीनंतर भाजपचा पुढील नेता कोण असणार, यावर चर्चा झाल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. संघ आणि भाजपमध्ये कोणता वारसदार ठरवायचा यावर चर्चा सुरू आहे, याची माहिती आम्हाला येत असते, असा दावा त्यांनी केला.

2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी 75 वर्षे पूर्ण केलेल्या नेत्यांना सत्तेच्या पदांवरून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी भाजपने मार्गदर्शक मंडळ स्थापन करून लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांसारख्या दिग्गज नेत्यांना सत्तापदापासून दूर केले होते. आता खुद्द मोदीच 75 वर्षांचे होत आहेत, त्यामुळे त्यांनी स्वतः तयार केलेल्या नियमाचे पालन करावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून केली जात आहे.

भाजपच्या अंतर्गत राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींच्या निवृत्तीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात उलथापालथ होत आहे. मोदींच्या संभाव्य वारसदारांवर देखील विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, मोदींच्या पुढील निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!