
सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक केल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर तीव्र टीका केली.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवणाऱ्या खोक्या अर्थात सतीश भोसलेला अखेर पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर तो फरार झाला होता. मात्र, आता त्याला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, हा गुंड कार्यकर्ता आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे.
विरोधकांनी यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर जोरदार टीका केली आहे. पोलिसांना नेहमी सोयीस्कर गुन्हेगार सापडतात, पण गैरसोयीचे गुन्हेगार सापडत नाहीत, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी सरकारला लक्ष्य करत, ‘आकांचा आका शोधला, आता खोक्याचा बोका शोधा” असे म्हणत आक्रमक भूमिका घेतली आहे.

सरकारवर बोचरी टीका
विजय वडेट्टीवार यांनी खोके प्रकरणावर भाष्य करताना जोरदार शब्दांत सरकारला सुनावले. ‘खोके म्हणजे नेमके काय आणि त्यामागे कोण आहेत, हे समजणे गरजेचे आहे. सरकारने आकांचा आका शोधला, तसेच आता खोक्याचा बोका कोण आहे, हे शोधले पाहिजे. ते सापडले तर मोठा आनंद होईल, असे ते म्हणाले.
वडेट्टीवारांनी समोर प्रश्न उपस्थित केला की, हे खोके नेमके कुठून येतात? सोन्याचा साठा कुठून येतो? आणि त्यामागे कोणाचा आशीर्वाद आहे? या सर्व गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे. वडेट्टीवार यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पूर्वी पोलिसांना पाहून गुंडांच्या चड्ड्या पिवळ्या व्हायच्या, पण आता पोलिसांनाच धाक राहिलेला नाही, अशी बोचरी टिप्पणी त्यांनी केली.
गुंडागिरीला राजकीय पाठबळ
सतीश भोसले उर्फ खोक्या हा गेल्या काही वर्षांपासून बीड जिल्ह्यात गुंडगिरीसाठी कुप्रसिद्ध आहे. वाल्मिक कराडच्या दहशतीशी त्याचा जवळचा संबंध आहे. काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर त्याच्यावर आणखी आरोप झाले. शिरूर कासार तालुक्यात तो ‘गोल्डमॅन’ या नावाने ओळखला जातो.
भोसलेच्या आलिशान जीवनशैलीमुळे तो सातत्याने चर्चेत राहिला आहे. मोठ्या गाड्यांचा ताफा आणि त्याच्या भोवती असलेल्या समर्थकांमुळे तो स्थानिक पातळीवर प्रभाव टाकतो. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असूनही, त्याला राजकीय संरक्षण मिळत असल्याचे आरोप होत आहेत.