प्रशासन

Charan Waghmare : सरकारी गाड्या फिरतात, पण वाघ मरतो

Forest Department: वन्यजीवन वाचवा नाहीतर जनआंदोलन होईल

Post View : 16

Author

विदर्भात मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होत असताना प्रशासन मात्र गप्प आहे. वनविभागाच्या निष्क्रियतेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार चरण वाघमारे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

विदर्भातील जंगल परिसराजवळ दिवसेंदिवस मानव आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष वाढत आहे. जंगलाचा विस्तार कमी होत चालला आहे, तर मानवी वस्ती वाढत आहे. परिणामी, वाघ, बिबटे, अस्वल आणि हरणांसारखे प्राणी पाण्यासाठी, अन्नासाठी गावांमध्ये शिरत आहेत, आणि शेवटी त्यांचा हकनाक मृत्यू होत आहे. पण या जीवांच्या मृत्यूला जबाबदार कोण? हा प्रश आद्यपही अनुत्तरित आहे.

वन्यप्राण्यांच्या मृत्यूबाबत प्रशासनाची निष्क्रियता आणि जंगल विभागाच्या ढिसाळ कार्यप्रणालीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार चरण वाघमारे यांनी थेट हल्लाबोल केला आहे. विदर्भातील भंडारा, तुमसर, नाकाडोंगरी, लेंडेझरी या जंगल परिसरात वाढत्या मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटना प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे घडत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सरकारी यंत्रणा फक्त 12 ते 15 लाखांच्या गाड्यांमध्ये फिरूनच जंगल संरक्षण करणार असेल, तर हा प्राण्यांच्या अस्तित्वाशी खेळ आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. जंगलातील वाघ मृत्यूमुखी पडतो, त्याचा मृतदेह कुजतो, आणि तरीही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती होत नाही. ही परिस्थिती म्हणजे वन गस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह आहे. कर्मचारी जंगलात फिरतच नाहीत का? की त्यांना काम करण्याची इच्छाच उरली नाही? असा संतप्त सवाल उपस्थित करत वाघमारे यांनी शासनाच्या निष्क्रियतेवर कठोर शब्दांत टीका केली आहे.

Local Body Elections: शिंदे-भाजप-मनसे येणार एकत्र

सुस्त प्रशासन

चरण वाघमारे यांनी लोकप्रतिनिधींवरही जहरी टीका केली. घटना घडल्यावर काही लोकप्रतिनिधी फोटो काढायला येतात, फेसबुक-इंस्टाग्रामवर टाकतात, आणि मग गुप्त होतील. खरं काम करायचं कुणी? की जंगलात फक्त फोटोसेशनसाठी जायचं? असा घणाघात करत त्यांनी सरकारच्या धोरणांवर बोट ठेवले.

वन्यप्राणी आणि मानव संघर्ष आज वाढत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे जंगलाजवळ वाढत चाललेली नागरी वस्ती. मात्र सरकारने कोणतेही ठोस निर्णय घेतलेले नाहीत. फक्त निवडणुकीच्या प्रचारात ‘जंगल संरक्षण’चा गजर करायचा आणि नंतर सगळीच शांतता. लोकांनी विश्वास ठेवायचा कुणावर? प्रशासनावर की निवडणुकीच्या वेळीच जागे होणाऱ्या नेत्यांवर? असा जळजळीत प्रश्न वाघमारे यांनी उपस्थित केला आहे.

Parinay Fuke : भगिरथ प्रयत्न अन् गरजूंच्या डोक्यावर छत

फक्त घोषणाबाजी

सरकारने जर ठोस पावले उचलली असती तर आज जंगलातील परिस्थिती अशी बिकट राहिली नसती. जंगलातच मुबलक पाणी आणि अन्नसाठा उपलब्ध करून दिल्यास प्राणी गावात फिरकणार नाहीत. यासाठी ऊस, गवत, फळझाडे इत्यादी लागवड केली पाहिजे. पण यासाठी निधी कोण मंजूर करणार? आणि तो निधी योग्य ठिकाणी वापरणार कोण, यावर सरकार गप्प आहे.

वाघमारे यांच्या मतानुसार, जंगल क्षेत्रात मजबूत जाळीचे कुंपण उभारल्यास निश्चितच मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळता येईल. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात बेटाळा जिप क्षेत्रात फेन्सिंग करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र निवडणुकीतील निकाल आणि शासनाच्या उदासीन धोरणांमुळे हा प्रकल्प वाया गेला.

Harshwardhan Sapkal: आरएसएसचे स्वयंसेवक महाराजांच्या नखा इतकेही नाही

जनआंदोलन हाच पर्याय

विदर्भातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य वाढली, पण सरकारकडे नियोजनाचा अभाव आहे. प्राणीसंख्या वाढली, जंगल मात्र आक्रसत चालले आहे. परिणामी, वाघ, बिबटे आणि इतर हिंस्र प्राणी मानवी वस्तीत घुसू लागले आहेत. असे किती बळी गेल्यावर सरकारला जाग येईल.

चरण वाघमारे यांनी इशारा दिला आहे की, जर वन्यप्राणी आणि मानवाचे जीव वाचवण्यासाठी त्वरित निर्णय घेतले नाहीत, तर मोठ्या जनआंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. शासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वन्यप्राणी ट्रॅकिंग, जंगल वॉच टॉवर्स, अधिक गस्ती कर्मचारी आणि वनरक्षक यांची संख्या वाढवावी.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!