महाराष्ट्रात बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात आठ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले आहे. एक हजारहून अधिक बनावट शिक्षकांनी शाळांमध्ये नियुक्ती घेतल्याचे उघड झाले आहे.
शिक्षण क्षेत्रात मोठा हादरा देणाऱ्या शालार्थ घोटाळ्याने पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. हे प्रकरण केवळ बनावट नियुक्त्यांपुरते मर्यादित नाही. हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या गुन्हेगारी टोळीचे खळबळजनक प्रकरण उघड झाले आहे. 2019 ते 2025 सहा वर्षांच्या काळात राज्यभरातील शाळांमध्ये तब्बल 1 हजार 56 बनावट शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. हे शिक्षक शालार्थ आयडीसारखी अधिकृत ओळख बनावट दस्तऐवजांनी सादर करून शाळांमध्ये रुजू झाले. इतकंच नाही, तर या शिक्षकांच्या वेतनातून ‘कमिशन’ कापण्याचा काळा धंदाही बिनदिक्कत सुरू होता. या घोटाळ्यामुळे राज्य सरकारच्या ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण’ योजनेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताचे पुरावेही समोर आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील या प्रकरणात सदर पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. उर्वरित आरोपींचा तपास सुरू असून लवकरच त्यांना अटक केली जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले आहे.या आठ आरोपींमध्ये यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि नागपूर येथील पराग पुडके, उल्हास नरळ, निलेश मेश्राम, संजय बोधाडकर, सुरज नाईक, महेंद्र महेशकर, राजू मेश्राम आणि चरण जेटूले यांचा समावेश आहे. या सर्वांविरोधात भारतीय दंड विधानातील कलम 420 (फसवणूक) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रमुख सूत्रधार फरार
आरोपींनी बनावट नियुक्ती आदेश, बनावट अनुभव प्रमाणपत्र आणि बनावट शालेय लेटरहेड वापरून मुख्याध्यापक पदापर्यंत मजल मारली होती. विशेष म्हणजे, आरोपी पराग पुडके याची कोणत्याही शाळेत कोणतीही नियुक्ती नव्हती. तरीही तो भंडाऱ्याच्या अधीक्षक रवींद्र सलामे यांच्या बनावट आदेशाद्वारे नागपूरमधील एस. के. बी. शाळेत मुख्याध्यापक म्हणून रूजू झाला. सलामे याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तो सध्या गडचिरोलीत कार्यरत होता. महेंद्र महेशकर या अटकेत असलेल्या आरोपीच्या मदतीने बनावट अनुभव प्रमाणपत्र तयार करण्यात आले होते. हे दस्तऐवज वापरून शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या सर्व घडामोडींमुळे संपूर्ण भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार नीलेश वाघमारे मात्र अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. काँग्रेस नेते तथा विधीमंडळ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांना थेट पत्र लिहून त्यांनी यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. वाघमारे अजूनही फरार आहे. यावरून पोलिसांचा हलगर्जीपणा स्पष्ट होतो. पोलिसांनी अजूनही त्याच्या अटकेसाठी ठोस पावले उचललेली नाहीत. ही बाब अत्यंत संशयास्पद आहे, असे वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात म्हटले. त्याचबरोबर त्यांनी स्वत: पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालून वाघमारेला अटक करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली आहे.
Pratibha Dhanorkar : विकासपुरुष, देवा भाऊंच्या गावी जाणाराच महामार्ग खड्डेमय
शिक्षणक्षेत्र म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याचं केंद्रबिंदू. अशा गंभीर घोटाळ्यांमुळे संपूर्ण समाजाचा त्या व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होतो. बनावट शिक्षक, बनावट कागदपत्रं, आणि भ्रष्ट अधिकारी यांचं हे त्रिकूट शिक्षणव्यवस्थेच्या मुळावर उठल्याचं दुर्दैवी वास्तव उघड करत आहे.