शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपुरमधील दोन उच्चपदस्थ शिक्षण अधिकाऱ्यांना अटक करण्यात आले. बनावट शिक्षक भरतीमागील भ्रष्टाचाराचा तपास सुरू आहे.
महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याने आता अधिकच गहिरे स्वरूप धारण केले आहे. राज्यभरात बनावट कागदपत्रांच्या आधारे 1 हजार 56 बोगस शिक्षक विविध शाळांमध्ये भरती झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हे शिक्षक केवळ फसव्या ओळखपत्रांमुळे शाळांमध्ये शिरले नाहीत, तर त्यांच्या पगारातून टक्केवारी वसूल करत एक संपूर्ण भ्रष्ट साखळीच कार्यरत होती, असे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आता नागपूर शहरात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. येथील दोन वरिष्ठ शिक्षणाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
शालार्थ आयडीच्या गैरव्यवहारात प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांच्यावर थेट कारवाई करत एसआयटीने या प्रकरणात न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे. 2019 ते 2025 सहा वर्षांच्या कालखंडात शिक्षण विभागाच्या शालार्थ प्रणालीचा गैरवापर करत बनावट शिक्षकांना सरकारी नोकरीत घुसविण्यात आले. ऑनलाइन शालार्थ आयडी तयार करून खोट्या शिक्षकांना भरती देण्यात आली. शासनाच्या तिजोरीवर कोट्यवधींचा भार टाकण्यात आला. विशेष म्हणजे, या आयडी जारी करण्याची अधिकृत प्रक्रिया पूर्ण न झालेली असताना, शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून कोणताही अधिकृत आदेश न देता आयडी तयार करण्यात आले. यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Nagpur : मनसे कार्यकर्त्यांनी एनआयटी कार्यालयात फेकली भ्रष्टाचाराची शाई
एसआयटीची कारवाई सुरू
पोलिस तपासात हे संपूर्ण जाळं उजेडात आलं असून अनेक वरिष्ठ व मध्यमस्तरातील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले आहे. नागपूर शहराच्या झोन 2 पोलिस उपायुक्त नित्यानंद झा हे या तपास पथकाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्याच देखरेखीखाली नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतून 24 पेक्षा अधिक आरोपींना अटक झाली आहे. तसेच, या कारवाईतून शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील कागदपत्रे आणि आदेशांची चौकशी सुरू आहे. सिद्धेश्वर काळुसे हे मार्च 2024 पासून कार्यरत आहेत.
रोहिणी कुंभार या मार्च 2022 ते मार्च 2024 पर्यंत त्या पदावर होत्या. या काळातच मोठ्या प्रमाणात बनावट आयडी जारी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नागपूरनंतर आता या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरत चालली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्येही तीन प्रकरणं दाखल झाली आहेत. राज्यभरातून यासंदर्भातील तक्रारींचा ओघ सुरू आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एसआयटीच्या तपास अधिकार क्षेत्राला वाढवण्याची मान्यता दिली आहे. या घोटाळ्याने शिक्षण क्षेत्रातील विश्वासार्हतेवर गदा आणली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दावा करणाऱ्या शासनाच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. येत्या काही दिवसांत या प्रकरणातून अजून धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.