
शेअर बाजारातील प्रचंड घसरणीवर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे.
शेअर बाजारासाठी 8 एप्रिल 2025 हा एक ऐतिहासिक काळा दिवस ठरला. हा दिवस ब्लॅक मंडे म्हणून ओळखला जाईल, कारण दोन्ही प्रमुख निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद झाले आहे. गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये बाजारातून गमावले गेले आणि बाजाराची नऊ महिन्यांची नीचांकी पातळी गाठली गेली. या प्रचंड घसरणीच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शेअर बाजाराच्या सत्राच्या शेवटी, निफ्टी तब्बल 50 हजार 742.85 अंकांनी घसरून 22 हजार 161.60 वर स्थिरावला. तर सेन्सेक्सने 2 हजार 226 अंकांची मोठी घसरण घेत 73 हजार 137 अंकांवर विश्रांती घेतली. ही घसरण इतकी भयंकर होती की अनेक गुंतवणूकदारांची वर्षानुवर्षे कमावलेली संपत्ती काही तासांतच नाहीशी झाली. देशाच्या पंतप्रधानांनी धोरणे ठरवायची असतात, शेअर ब्रोकरसारखा सल्ला द्यायचा नसतो असा आरोप काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केला आहे.
नियोजनबद्ध कट
देशाच्या प्रमुखाने उद्योगधंद्यांमध्ये थेट हस्तक्षेप न करता देशातील आर्थिक धोरणे ठरवावीत, अशी अपेक्षा असते. मात्र, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः शेअर बाजारातील हालचालींचे अंदाज वर्तवले आणि लोकांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले. नरेंद्र मोदी आपला मित्रांच्या कंपनीची जाहिरातही करतात. लोंढे यांनी सांगितले की, 2024 निवडणुक दरम्यान मोदींनी भाकीत केले होते कीशेअर बाजार उसळी मारेल.
मोदींचे ऐकून अनेक मध्यमवर्गीय आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये पैसे ओतले. परंतु, प्रत्यक्षात काय झाले. मागील 28 दिवसांत भारतीय शेअर बाजारातून तब्बल 92 लाख कोटी रुपये गायब झाले, आणि केवळ एका दिवसात 19 लाख कोटींची संपत्ती गमावली. लोंढे म्हणतात की, हे सगळे नियोजनबद्ध होते. लोकांना मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करायचे आणि मग त्यांचे पैसे उधळायचे. त्यांच्या मते मोदी सरकारच्या निर्णयांमुळे मध्यमवर्गीयांची आर्थिक सुरक्षितता धोक्यात आली.
जवाबदारी कुणाची
यापूर्वी लोकांच्या भविष्याची हमी देणाऱ्या योजना होत्या. पेन्शन, स्मॉल सेव्हिंग्स, उच्च व्याजदर असलेल्या बचत योजना. मात्र, या योजना सरकारने संपवल्या आणि लोकांना शेअर मार्केटकडे वळवले. आता प्रश्न असा आहे ज्येष्ठ नागरिक, मध्यमवर्गीय, पेन्शन धारक आणि छोट्या गुंतवणूकदारांचे भविष्य काय? घरे खरेदी करायची असतील, मुलींचे लग्न करायचे असेल, आरोग्याच्या गरजा भागवायच्या असतील तर सामान्य नागरिकांनी आता काय करावे. असा सवाल लोंढे यांनी व्यक्त केला आहे.
लोंढे यांनी थेट सवाल केला की नरेंद्र मोदी यांना या प्रचंड आर्थिक नुकसानाची जबाबदारी घ्यावी लागेल का. त्यांनी आरोप केला की, मध्यमवर्गीयांच्या कष्टाच्या पैशांची लूट करण्याचा हा नियोजित कट आहे.ब्लॅक मंडे हा शब्द प्रथम 19 ऑक्टोबर 1987 रोजी वापरण्यात आला. जेव्हा जागतिक शेअर बाजार कोसळला होता आणि 1.7 ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती नष्ट झाली होती. त्यावेळी जागतिक मंदीचा धोका निर्माण झाला होता.