
दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर आले आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्यांच्यावर खिळले. मात्र या एकतेनंतर शिंदे गटाकडून आलेली पहिली प्रतिक्रिया सगळ्यांना हादरवणारी ठरली.
वरळीच्या एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या मराठी विजय मेळाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला. तब्बल दोन दशकांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा गजर करत लाखो जनतेच्या उपस्थितीत स्फूर्तिदायक भाषणे दिली. मराठी भाषा, संस्कृती आणि स्थानिकांप्रती असलेली बांधिलकी हाच या कार्यक्रमाचा मुख्य गाभा होता. घडलेल्या महत्त्वपूर्ण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. यामध्ये उघडपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत राज ठाकरेंच्या भूमिकेचं कौतुक करण्यात आलं. शिंदे गटाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर एक आगळं वेगळं पोस्ट प्रसिद्ध करण्यात आलं. त्यामार्फत दोन्ही नेत्यांची स्पष्ट तुलना करण्यात आली आहे.
पोस्टमध्ये एकामागून एक 9 विरोधाभासी वाक्यांची मालिकाच उभी करण्यात आली आहे. ‘एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक’, ‘एक मराठीप्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी’, ‘एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड’, अशा तिखट शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे, राज ठाकरेंना प्रगल्भ, स्वाभिमानी आणि मराठीचा खरा पुरस्कर्ता ठरवण्यात आलं आहे. शिंदे गटाच्या या भूमिकेने स्पष्ट केलं आहे की, मराठी या मुद्द्यावरही आता राजकीय पक्ष एकवटण्याऐवजी आपापल्या विचारधारेप्रमाणे भूमिका घेतील. उद्धव ठाकरे यांची छवी ‘सत्ता गेल्याने अस्वस्थ झालेल्या नेत्याची’ तर राज ठाकरे यांची छवी ‘मराठी समाजाला एकत्र आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या’ नेत्याची म्हणून रंगवण्यात आली आहे.

Sunil Mendhe : वैनगंगेच्या पाण्यातून उभा राहिला विकासाचा पूल
प्रवीण दरेकरांचा टोला
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनीसुद्धा यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडत होते, तर उद्धव ठाकरेंच्या भाषणातून सत्तेची हळहळ जाणवत होती, असा आरोप त्यांनी केला. तसेच, उद्धव ठाकरेंमध्ये शरद पवार यांचीच आयडिओलॉजी भिनलेली आहे, असं सांगत त्यांनी महाविकास आघाडीतील जुन्या वळणांची आठवण करून दिली. दरेकरांनी कार्यक्रमातील गोंधळावरही भाष्य केलं. कोण वर बसणार, झेंडे कोणते आणायचे, यावरच स्पष्टता नव्हती. हे राजकीय पेरणीचं मेळावं होतं, असा आरोप त्यांनी केला.
दरेकरांनी शिवसेना (उद्धव गट) वर आरोप करताना विचारलं की, मुंबई महापालिकेत कोण कंत्राटदार फोफावले? किती मराठी माणसांना संधी मिळाली? तुमच्या काळात मराठी भाषा भवन उभं राहिलं का? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. भाजपने मराठीसाठी ठोस भूमिका घेतल्याचा दावा करत त्यांनी सांगितलं की, मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यात फडणवीसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.