
अकोल्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने रणशिंग फुंकले आहे. स्वबळावर लढणार की युतीत सामील होणार, याच प्रश्नाने राजकीय वर्तुळात उत्सुकतेचं वादळ उसळलं आहे.
राजकीय पारडं हलू लागलं आहे, पक्ष कार्यालयांत धडपड सुरू आहे. कार्यकर्त्यांत चैतन्य संचारलं आहे, कारण एकच, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक. अकोल्यात महापालिकेच्या रणधुमाळीसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने युद्धनिनाद केला आहे. ‘युतीत लढणार की स्वतंत्र?’ यावरून राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
16 मे रोजी अकोल्यात एकनाथ शिंदे गटाने घेतलेली आढावा बैठक ही फक्त तयारी नव्हे, तर भविष्यातील विजयाची दिशा ठरवणारी ठरली. अकोला पश्चिम भागात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, शाखाप्रमुख, बूथप्रमुख यांची हजेरी लक्षणीय होती. शहर प्रमुख रमेश गायकवाड यांनी स्पष्ट सांगितलं, शिवसेना शिंदे गट अकोला महापालिकेच्या सर्व 80 जागांवर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील, त्याचे आम्ही तंतोतंत पालन करू. पण आमची संघटना पूर्ण ताकदीने सज्ज आहे.

आदेश पाळणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की आगामी स्थानिक निवडणुकीत महायुती एकत्र लढणार. मात्र यावर प्रतिक्रिया देताना गायकवाड म्हणाले, पक्षश्रेष्ठींनी जर युतीत लढण्याचे आदेश दिले, तर आम्ही युतीत लढू. पण आम्ही स्वतंत्रपणे लढण्यासही सज्ज आहोत. या बैठकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘शिव संपर्क अभियान’. निवडणुकीपूर्वी जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी, त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि पक्षाच्या सदस्यांची नोंदणी वाढवण्यासाठी हे अभियान राबवले जाणार आहे. विशेषतः रखडलेली नागरी कामे मार्गी लावण्यासाठीही शिंदे गट कार्यरत होणार आहे.
Chandrashekhar Bawankule : तिरंग्याच्या सावलीतून काँग्रेसवर बाण
जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर आणि अश्विन नवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करताना सांगितले की, स्थानिक लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक हिच खरी प्रचाराची दिशा आहे. त्यामुळे नवीन मतदारांची नोंदणी, जुने प्रश्न सोडवणे आणि बूथ स्तरावर काम करणं हे तीन महत्त्वाचे अजेंडे स्पष्ट झाले आहेत. या बैठकीनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, शिंदे गट काहीही होवो, निवडणुकीला सज्ज आहे. मात्र ते महायुतीच्या छत्रछायेखाली लढणार की आपली स्वतंत्र ओळख जपणार, यावरून अकोल्यात आणि जिल्ह्यात राजकीय चर्चांना नवा आयाम मिळाला आहे.
राजकीय गणित
राजकीय समिकरणं कशी जमतील? युतीचा लाभ कुणाला होईल? शिवसेना शिंदे गट स्वबळावर किती ताकद दाखवेल? हे सर्व प्रश्न आज अकोल्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. परंतु एक गोष्ट नक्की, अकोल्यात शिवसेना शिंदे गटाने पहिलाच डाव आक्रमकपणे खेळायला सुरुवात केली आहे.
शहर प्रमुख रमेश गायकवाड यांच्यासह शहर संघटक सागर, उपशहर प्रमुख राजेश दांडेकर, उपशहर प्रमुख भूषण इंदोरिया, नितीन बदरखे, प्रतीक मानेकर सुमीत पनझाडे, आकाश दलाल, प्रदीप काशीद, गोलू वाडे, सचिव उमेश लांडगे, विभाग प्रमुख चेतन जैन, अमित यादव, राहुल सोनार, विशाल शर्मा, भानुदास गोंधेकर, वैभव बोरचाटे आणि नितु गांगलवार आदींनी उपस्थिती लावली.