महाराष्ट्र

Narendra Bhondekar : शांत आहे पण रौद्र रूप दाखवलं तर… 

Shiv Sena : अंतर्गत कुरघोडीला आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला पूर्णविराम

Share:

Author

25 जून रोजी भंडारा जिल्ह्यात होणारा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दौरा अनपेक्षितपणे रद्द झाला होता. मात्र हा दौरा अखेर 28 जून रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.

राज्यात महापालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू होण्याच्या तयारीत असताना, शिवसेना शिंदे गटाने पूर्व विदर्भात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्याने पुन्हा एकदा विदर्भातील राजकारणात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, 25 जून रोजी होणार हा दौरा अचानक रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता 28 जून रोजी हा दौरा मोठ्या दिमाखात पार पडला.शिवसेना शिंदे गटाने भंडाऱ्यात आयोजित केलेल्या भव्य प्रवेश मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर, मंत्री आशिष जयस्वाल आणि इतर प्रमुख नेत्यांची यावेळी उपस्थिती होती.

कार्यक्रमातून शिंदे गटाने पूर्व विदर्भात आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.25 जूनच्या रद्द केलेल्या दौऱ्यामागे पक्षातील अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्या सर्व चर्चांना भोंडेकर यांनी थेट पूर्णविराम दिला. ‘साहेबांनी मला पूर्व विदर्भाचा नेता केलंय, हे काही छोटं पद नाही. मंत्रीपद मिळालं नाही, म्हणून मी नाराज नाही, असं ठामपणे सांगत भोंडेकरांनी चांगलाच टोला लगावला आहे. लोक मला वारंवार विचारतात, तुम्ही मंत्री कधी होणार? पण माझी घाई नाही. साहेब जेव्हा समजतील, तेव्हा देतील, असं भोंडेकरांनी स्पष्ट केले. भोंडेकर पुढे म्हणाले की पक्षातील पद ही केवळ शोभेची गोष्ट नसून, ती जबाबदारी आहे.

पक्षावर टीका नको

सभेत बोलताना भोंडेकर यांनी ठामपणे सांगितले, आमच्यावर टीका चालेल, पण पक्षावर नको. पक्षावर जर कोणी बोट ठेवलं तर आम्ही ते सहन करणार नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास दिसून आला. माझ्याकडे आमदारकी आहे, मंत्री झालो नाही म्हणून मी नाराज नाही. मी माझ्या संघटनेच्या कामात पूर्ण वेळ देतो. जो माझ्याकडे येईल, त्याच्यासाठी मी कायम उभा आहे, असं त्यांनी ठणकावून सांगितले. भोंडेकरांनी आपल्या भाषणात थेट इशारा देत म्हटलं, मी शांत आहे, पण जर शांतता सोडली तर माझं रूप रौद्र होईल.

Eknath Shinde : भंडाऱ्यात सापडतात खरे वाघ 

जसं साहेब ऐकतात तसं आम्ही देखील ऐकतो. पण त्याची एक लिमिट असते. त्यानंतर आम्हालाही कोण थांबवू शकत नाही अश्या तिखट शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.  तसंच त्यांनी प्रत्येक निवडणुकीत सक्रीय सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वराज्य संस्था असो किंवा सहकार संस्था, आम्ही प्रत्येक निवडणुकीत उतरतो. सरकारमधून निधी आणण्याचं काम देखील आम्ही करत आहोत, असं त्यांनी ठामपणे सांगितले. भोंडेकरांनी शेवटी मोठी घोषणा करत सांगितलं की, भंडाऱ्यातील दोन महत्त्वाचे प्रकल्प मंजूर झाले असून त्यातील 102 कोटी रुपयांचा पहिला प्रकल्प 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यामुळे भंडाऱ्याचा विकास अधिक वेगाने होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!