महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार हे बजेट सादर करणार आहेत. यासंदर्भात शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी बऱ्याच अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
राज्यातील महायुतीचं सरकार निवडणूक आयोगाच्या कृपेमुळं सत्तेवर आलं आहे. हे सरकार बेईमानीचं सरकार आहे. राज्याचा अर्थसंकल्प आता सादर होणार आहे. सरकारनं लाडक्या बहिणींनी 2 हजार 500 रुपयांचा मोबदला द्यावा, अशी मागणी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. विधान भवनात पत्रकारांशी बोलतानात त्यांनी अर्थसंकल्पाबद्दल अनेक अपेक्षा व्यक्त केला. भाजपकडून दिल्लीत महिलांना 2 हजार 500 रुपये देण्यात येत आहेत. निवडणुकीपूर्वी सरकारानं 2 हजार 100 रुपये देण्याचं वचन दिलं होतं. अद्यापही ही रक्कम देण्यात आलेली नाही, असं ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लवकरच होणार आहे. या निवडणुकीनंतर सरकार लाडकी बहीण योजना बंद करेल. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील अनेक योजना सरकारनं बंद केल्या आहेत. अगदी त्याच प्रमाणं लाडकी बहीण योजनाही बंद केली जाईल, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. लोकांची फसवणूक करून महायुती सत्तेवर आली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. आता महायुती सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी देखील आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.
Amol Mitkari : संकट कितीही गडद असलं तरी दादा राज्याला तारणार
राज्य कर्जाच्या ओझ्याखाली
महायुतीच्या कार्यकाळात राज्य कर्जबाजारी झाले आहे. तिजोरीत खडखडात आहे. अशात लोकांना खुश करण्यासाठी दिशाभूल करणाऱ्या घोषणा सरकारकडून करण्यात येत आहेत. एकही योजना प्रत्यक्षात येण्यासारखी नाही. निवडणुकीपूर्वी सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केली. विकास कामांना थांबवून त्यातील पैसा महिलांच्या खात्यात टाकण्यात आला. आता सरकारच्या तिजोरीत पैसाच नाही. त्यामुळे विकास कामंही खोळंबणार आहे व बहिणींचीही फसवणूक होणार असल्याचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
सरकारकडून महाराष्ट्राकडं पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. गुजरातला कसा फायदा होईल, याची काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्रातील तरूण बेरोजगार आहेत. दावोसमधील करारांच्या नावाखाली सरकार आपली पाठ थोपटून घेत आहे. परंतु सरकार जनतेची मोठी फसवणूक करीत आहे. गेल्या अर्थसंकल्पातही अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या. अनेक महामंडळांची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकी एकाचीही अंमलबजावणी पूर्ण झालेली नाही, अशी टीकाही आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्वसामान्यांचा भ्रमनिरास होणार असल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केला. यंदाच्या अर्थसंकल्पही केवळ घोषणाचा पाऊसच राहणार आहे. निरर्थक असाच हा अर्थसंकल्प असेल असेही आमदार ठाकरे म्हणाले.