मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर अभिनेत्री हेमांगी राव यांनी गुंडगिरीच्या जोरावर जमीन बळकावण्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी थेट फडणवीस आणि शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे.
मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या खालापूर तालुक्यातील जमिनीवरून मोठा गहजब सुरू आहे. या वादाच्या केंद्रस्थानी आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार महेंद्र थोरवे, ज्यांच्यावर आता अभिनेत्री हेमांगी राव यांनी थेट भूखंड बळकावण्याचा आरोप केला आहे. गुंडगिरीच्या जोरावर जमिन हस्तगत करण्याचा गंभीर आरोप करत हेमांगी राव यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या कुटुंबावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे.
हेमांगी राव यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. अखेर या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, शिंदे गटाच्या प्रतिमेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Mahayuti : लाडक्या बहिणींना सुखी करण्याचा प्रयत्नात नेते झालेत दुःखी
गुंडगिरीच्या जोरावर कब्जा
खालापूर तालुक्यातील कांडरोली गावात अभिनेत्री हेमांगी राव आणि त्यांचे पती डॉ. विनोद राव यांची जमीन आहे. नवी मुंबईतील व्यावसायिक विकासक दीपक वाधवा यांनी काही वर्षांपूर्वी या जमिनीचा व्यवहार केला होता, परंतु काही कारणास्तव हा व्यवहार पूर्ण झाला नाही. मात्र, आता वाधवा यांनी जबरदस्तीने आणि दादागिरीच्या जोरावर ही जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हेमांगी राव म्हणाल्या, या प्रकरणात आमदार महेंद्र थोरवे यांनी वाधवा यांना थेट मदत केली आहे. जमिनीवर जबरदस्तीने कब्जा करण्यासाठी धमकी देण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एवढेच नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांवर मानसिक तणाव वाढवण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिंदे गटाच्या आमदारावर आरोप
हेमांगी राव यांनी सांगितले की, त्यांनी चार वेळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. उलट, स्थानिक प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे शिंदे गटाच्या आमदारांवर संशयाची सुई रोखली गेली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा आमदार अशा प्रकारच्या गुंडगिरीच्या कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय रणकंदन
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय वादळ शांत झाले असतानाच हे प्रकरण नव्याने तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील नेत्यांवर आरोप होत असतानाच, आता शिंदे गटातील आमदारावर गंभीर आरोप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढे काय परिणाम होतो, यावर शिंदे गटाच्या भवितव्याचा मोठा प्रभाव पडू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणावर काय भूमिका घेतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण सध्या तरी हेमांगी राव यांच्या तक्रारीमुळे हा विषय महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.
