
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
मुंबईतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक, तेजस्वी घोसाळकर यांनी पदांचा राजीनामा दिला आहे. ठाकरे कुटुंबाशी जवळचा संबंध असलेल्या घोसाळकर कुटुंबातील या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात खळबळ उडाली आहे.
महानगरपालिकेच्या निवडणूक तोंडावर असताना शिवसेनेच्या ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद समोर येऊ लागले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी मोठे राजकीय पाऊल उचलले आहे. विभागप्रमुख आणि संघटकांवरील नाराजी अनेक वेळा व्यक्त करूनही पक्षाने ती गांभीर्याने घेतली नाही. अखेर, पक्षाच्या कार्यपद्धतीतून नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिला.

Super Speciality Hospital : अमरावती बनणार अवयव प्रत्यारोपणाचं हब
मातोश्रीकडून समजूतीचे प्रयत्न
राजीनाम्याची माहिती मिळताच मातोश्रीकडून तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत. तेजस्वी घोसाळकर यांना बोलावून घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी संवाद सुरु केला आहे. तेजस्वी घोसाळकरांनी व्हॉट्सॲपवरूनच विभागप्रमुखांना राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये किंवा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या पतीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर, आता तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षापासून पूर्णपणे दूर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेना ठाकरे गटात अस्वस्थता वाढली आहे.
तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेविका आहेत. त्यांच्या सासऱ्यांनी विनोद घोसाळकर यांनी दहिसर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून काम केले आहे. त्यामुळे घोसाळकर कुटुंबाची राजकीय पकड भक्कम आहे. राजीनाम्यानंतर त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. ठाकरे गटाच्या अंतर्गत असलेल्या गटबाजीमुळे नाराजी वाढत गेली होती. त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्यानंतर पक्षाने योग्य पाठबळ दिले नसल्याचे अनेक वेळा जाणवले.
डॅमेज कंट्रोलची तयारी
तेजस्वी घोसाळकर यांनी नुकतीच एका व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेल्या धमकीचा उल्लेखही केला होता. लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद, असा मेसेज त्यांच्या नावाने ग्रुपवर फिरला होता. या धमकीमुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. राजीनाम्यानंतर त्यांनी दिलेल्या पत्रात, मी तेजस्वी घोसाळकर, महिला दहिसर विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. या पदावर कार्य करताना पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख आणि आपले मन:पूर्वक आभार मानते. माझा हा राजीनामा स्वीकारावा, असे नम्रपणे नमूद केले आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी ही घटना मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही. महापालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना, अशा प्रकारची राजकीय उलथापालथ पक्षासाठी अडचण ठरू शकते. त्यामुळे ठाकरे गट डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत मिळत आहेत. तेजस्वी घोसाळकर यांचा निर्णय केवळ त्यांच्या व्यक्तिगत नाराजीचा परिणाम नाही तो संपूर्ण पक्षातील अंतर्गत विसंवादाचं प्रतीक मानला जात आहे. त्यामुळे या घटनेचा पुढील राजकीय वाटचालीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.