शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांकडून शासनाकडे मागणी करण्यात येत आहे. अमरावतीत या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने दादा भुसे यांच्या ताफ्यावर कापूस फेकून केले आंदोलन.
अमरावतीत 6 फेब्रुवारी रोजी चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आक्रमक होत शेतमालाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. मात्र आंदोलन सुरू असतानाच अनपेक्षित घटना घडली. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांनी थेट कापूस आणि तुरीचा मारा केला.
मंत्री भुसे नियोजन भवनात आढावा बैठकीसाठी जात असताना शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या गाडीकडे तुरी आणि कापसाचा वर्षाव केला. काही क्षणांतच वातावरण तापले आणि परिसरात गोंधळ उडाला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारवर हल्लाबोल केला.
शेतकऱ्यांमध्ये असंतोष
शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी आंदोलन होत आहे. बाजारात सध्या सोयाबीन, तूर आणि कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ठाकरे गटाने सरकारवर गंभीर आरोप करत, सोयाबीनला आठ हजार, कापसाला 10 हजार आणि तुरीला 12 हजार प्रति क्विंटल दर मिळावा, अशी ठाम भूमिका घेतली आहे.
शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत होते. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांनी शेतमाल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला आणि सरकारवर जोरदार टीका केली.
सरकारवर आरोप
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी भावांतर योजनेची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ही योजना फसवी ठरली आहे. केवळ कागदोपत्री खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना फसवले जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला.
शिवसेनेच्या आरोपानुसार, सत्ताधारी भाजपचे नेते आणि आमदार या प्रश्नावर गप्प आहेत. शेतकरी अडचणीत असताना, सरकार शांत बसलेले आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारण्याची वेळ आल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
या आंदोलनामुळे अमरावतीत राजकीय तापमान वाढले आहे. शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहता, सरकारला लवकरच या विषयावर निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा, हे आंदोलन आणखी तीव्रतेने होणार, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.