
अकोला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात घुसून उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड करत संताप व्यक्त केला.
अकोल्यात उन्हाची तीव्रता वाढली तशी नागरिकांची पाण्यासाठीची धडपडही उग्र रूप धारण करत आहे. अकोल्यातील मलकापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. तब्बल दहा दिवसांआड येणाऱ्या पाण्यामुळे संतप्त नागरिकांनी आता रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर 17 एप्रिल रोजी सकाळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी थेट अकोला महापालिकेत घुसले. पाणी द्या, पाणी द्या अशी जोरदार मागणी करत त्यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात धडक दिली.

गळ्यात नळांचा हार घालून आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी थेट कार्यकारी अभियंत्याच्या कक्षात तोडफोड केली आहे. पाणीपुरवठा अधिकारी कार्यालयात अधिकारी अनुपस्थित असल्याचे पाहताच आंदोलकांचा पारा चढला आणि त्यांनी कार्यालयातील खुर्च्या व इतर साहित्याची अक्षरशः फेकाफेक सुरू केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नागरिक आणि प्रशासनात खळबळ माजली आहे. आंदोलनकर्त्यांनी पाणी द्या नाहीतर खुर्ची खाली करा असा संतप्त इशाराही दिला.
घागर मोर्चा
मलकापूर भागातील स्थिती बिकट आहे. येथे अनेकांना पैसे देऊन टँकर बोलवावा लागत आहे. तर काही ठिकाणी स्थानिक नागरिक मिळून वर्गणी गोळा करून पाणी विकत घेत आहेत. अकोल्याच्या वाढत्या तापमानात पाण्याचा प्रश्न नागरिकांसाठी जीवनमरणाचा मुद्दा ठरत आहे. या संतप्त परिस्थितीचा उद्रेक झाला तो ठाकरे गटाच्या घागर मोर्चाच्या रूपानं. माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी डोक्यावर पाण्याचे मटके घेत थेट महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात धडक दिली. पाणी द्या, नाहीतर बिल माफ करा, अशा घोषणा करण्यात आल्या.
आक्रमक आंदोलनात पाणीपुरवठा अधिकारी अमोल डोईफोडे यांच्या कक्षात आंदोलनकर्ते पोहोचले, मात्र ते अनुपस्थित असल्यामुळे शिवसैनिकांचा राग अनावर झाला. काही क्षणांतच कार्यालयातील खुर्च्या हवेत फेकल्या गेल्या, महिलांनी आणलेल्या घागऱ्या देखील फोडण्यात आल्या. या गोंधळात महापालिकेत धावपळ उडाली, आणि काही वेळातच सिटी कोतवाली पोलीस दाखल झाले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वातावरण शांत झालं आणि अधिकारी व ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली.
Amravati : आकाशात उडाले स्वप्नांचे विमान, बळीराजाला कोट्यवधींचे अनुदान
तापमानात वाढ
सध्या अकोल्यात तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या प्रकल्पात फक्त 24 दलघमीहून कमी पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे दर दोन दिवसांआड एक टक्का जलसाठा कमी होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. महापालिकेने आता पाण्याच्या वापरावर काटकसर करण्याचं धोरण स्वीकारलं आहे. आगामी काळात शहराला दर पाचव्या दिवशीच पाणी मिळणार असल्याचं अमोल डोईफोडे यांनी स्पष्ट केलं आहे.