
विधानसभा निवडणुकीनंतर आता काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली आहे. अशात काही नेते आणि कार्यकर्त्यांना पदावरून दूर करण्यात आलं आहे.
रविवारी युवक काँग्रेसने नागपुरात संघ मुख्यालयावर जाऊन संघप्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याचे आंदोलन अचानक पुकारले. युवक काँग्रेसच्या या अत्यंत महत्त्वाच्या आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी दांडी मारली. त्यामुळे युवक काँग्रेसमधील 70 जणांना कार्यमुक्त करण्यात आलं आहे. दांडी मारल्यामुळे तब्बल 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीने पदमुक्त करण्यात आलं आहे. काँग्रेसने पदावरून दूर केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये विजय वडेट्टीवार यांची कन्या आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांचा समावेश आहे.
नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचे सुपुत्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस केतन ठाकरे यांनाही पदमुक्त करण्यात आलं आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अनुराग भोयर, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मिथिलेश कन्हेरे यांच्यासह अनेक युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. युवक काँग्रेसच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आल्यानं नागपूरसह राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवानी वडेट्टीवार यांचे वडिल विजय वडेट्टीवार हे विधानसभेचे माजी विरोधी पखनेते होते. ठाकरे यांचं वडील नागपूरचे आमदार आहेत. त्यांनी नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूकही लढविली होती.

नेत्यांचीच मुलं गायब
युवक काँग्रेसने नागपुरात संघ मुख्यालयावर जाऊन संघप्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याचे आंदोलन केलं. या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह काही कार्यकर्ते सहभागी झालेत. मात्र युवक काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला दांडी मारली होती. त्यामुळं काँग्रेसच्या या आंदोलनाला ‘पुअर शो’ झाला. अवघ्या 50 ते 60 कार्यकर्त्यांसोबत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना काँग्रेस कार्यालयावरून संघ मुख्यालयाकडे जावं लागलं.
आंदोलन करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यालयासमोरच अडवलं. आंदोलनातील हवा गेल्यानं युवक काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा संताप झाला. त्यामुळं त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधील 60 पदाधिकाऱ्यांना तातडीनं कार्यमुक्त केलं. काँग्रेसमधील नेत्यांनी ही माहिती दिली. अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्या दिवशी देश खऱ्या अर्थानं मुक्त झाला, असं मोहन भागवत म्हणाले होते.
भागवतांच्या वक्तव्याविरोधात नागपुरात युवक काँग्रेसने आक्रमक पवित्र घेतला होता. भागवत यांच्या विरोधात आंदोलन पुकारलं होतं. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चीब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसनं कोणताही परवानगी न घेता संघ मुख्यालयाच्या दिशेनं मोर्चा काढला होता. या मोर्चात अवघे 50 ते 60 कार्यकर्ते होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.