
महाराष्ट्राच्या महायुती सरकारमध्ये भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ताज्या घडामोडींमध्ये परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या निर्णयावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेवर कुरघोडी केली आहे. परंतु, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यावर जोरदार प्रत्युत्तर देत “अंतिम निर्णय माझाच असेल” असे ठणकावले आहे.
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजकीय नेत्याची वर्णी लावण्याची प्रथा मोडीत काढत फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याला ही जबाबदारी सोपवली. यामुळे शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसला. भरत गोगावले मंत्री झाल्यानंतर हे पद रिक्त होते, आणि नेहमीप्रमाणे ते शिवसेनेच्या वाट्याला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, फडणवीस यांनी राजकीय समीकरणे बदलत वरिष्ठ सनदी अधिकारी संजय सेठी यांची अध्यक्षपदी निवड केली.
राज्यात 2025 मध्ये 52 PI अन् 7 उपनिरीक्षक Retire होणार
सरनाईक यांची जोरदार प्रतिक्रिया
हा निर्णय शिवसेनेच्या गळी उतरणार नव्हता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने प्रतिक्रिया देत, “एसटी महामंडळाचा अध्यक्ष हा राजकीय व्यक्तीच असतो! ही नियुक्ती फक्त तात्पुरती आहे. अंतिम निर्णय माझाच राहील,” असे ठामपणे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने फडणवीसांच्या निर्णयाला थेट आव्हान दिले आहे.
एसटी महामंडळाच्या एक हजार तीनशे दहा बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या निविदेत घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. एसटीची आर्थिक परिस्थिती आधीच नाजूक असताना, हा गैरव्यवहार सरकारच्या नजरेस आला. त्यामुळेच फडणवीस यांनी एसटीच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्याऐवजी प्रशासकीय अधिकाऱ्याला नेमण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
“लाडकी बहीण”मध्ये डबल गेम
दरम्यान, “माझी लाडकी बहीण” योजनेवर देखील सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली. काही लाभार्थ्यांनी दोन-दोन ठिकाणी अर्ज भरून पैसे उचलल्याचे उघडकीस आले आहे. तपासणीदरम्यान, काहींनी हे पैसे परत करण्याची तयारी दर्शवली आहे. सरकार याबाबत कडक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट संकेत सरनाईक यांनी दिले.
सत्ताधारी युतीतील या संघर्षामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस यांनी शिवसेनेच्या वाटेतील एक महत्त्वाचे पद काढून घेत शह दिला, तर सरनाईक यांनीही हा निर्णय बदलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आता पुढे काय होणार? शिवसेना-भाजपमधील हा संघर्ष अधिक तीव्र होणार का? हे पाहणे रोचक ठरेल.