महायुतीतून थोडक्याच काळासाठी दुरावलेले आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आता पुन्हा सहकाराच्या रणांगणात महायुतीची साथ स्वीकारली आहे. भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या संयमशील नेतृत्वात ही राजकीय मैत्री पुन्हा जुळली आहे.
भंडारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात सध्या एक नवा विश्वासाचा अध्याय सुरू होत आहे. शिवसेना शिंदे गट आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भूतकाळातील काही राजकीय निर्णय बाजूला ठेवत, महायुतीच्या सहकारी लढ्यात पुन्हा एकदा ठाम उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे पुनरागमन म्हणजे कोणतंही राजकीय दडपण किंवा मतभेद नव्हे, तर भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या सकारात्मक व समंजस भूमिकेचा परिपाक आहे.
दुग्ध संघाच्या निवडणुकीत भोंडेकरांनी केवळ त्या क्षणापुरत्या राजकीय गणितांनुसार काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासोबत युती केली होती. तेव्हा काहींना आश्चर्य वाटलं, काहींनी टीका केली. यावेळी डॉ. परिणय फुके काहीसे नाराज झाले होते. परिणय फुके हे नरेंद्र भोंडेकर यांना आपले भाऊ मानतात. भोंडेकर पटोले यांच्यासोबत गेल्यानंतर काहीसा शाब्दिक वार झाला होता. परंतु त्यावेळी परिणय फुके म्हणाले होते की, नरेंद्र भोंडेकर आमचे भाऊ आहेत, ते काहीही म्हणू शकतात. त्यानंतर आता दादांच्या नेतृत्वात भोंडेकर पुन्हा महायुतीत परतले आहेत.
विश्वासाचं नातं कायम
सहकार क्षेत्रातील समन्वय, संघटन, आणि जिल्ह्याच्या हिताचा विचार करतच, आमदार परिणय फुके यांनी सर्वच घटकांशी सातत्याने संवाद साधला. कोणत्याही राजकीय क्षोभाशिवाय त्यांनी भोंडेकर यांच्याशी विश्वासाचं नातं कायम ठेवलं. या सौम्य आणि समर्पित नेतृत्वामुळेच आज भोंडेकर पुन्हा महायुतीच्या सहकारी पॅनलमध्ये ठामपणे उभे आहेत.
या नव्या एकजुटीने भंडारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला एक नवा रंग चढला आहे. ही निवडणूक 27 जुलै रोजी होणार असून, महायुतीकडून भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेचे मिळून 21 उमेदवार रिंगणात आहेत. भोंडेकरांचं हे पुनरागमन म्हणजे महायुतीसाठी राजकीय नव्हे, तर सहकारी चळवळीच्या दृष्टिकोनातून बळकटीचं प्रतीक ठरत आहे.
अनेक नेत्यांची साथ
महायुतीच्या सहकारी पॅनलमध्ये जे उमेदवार आहेत, त्यामध्ये कैलाश नशीने, धर्मराव भलावी, सुनील फुंडे, प्रकाश मालगावे, प्रशांत पवार, प्रदीप पडोले, संदीप फुंडे, चेतक डोंगरे, योगेश हेडाऊ, आशा गायधाने, टीरा तुमसरे, नाना पंचबुधे, कवलजीतसिंह चड्ढा, विश्वनाथ कारेमोरे, होमराज कपगते, रामदयाल पारधी, अनिल सर्वे, सदानंद बर्डे, जितेश इखर, धर्मेंद्र बोरकर, श्रीकांत वैरागडे यांचा समावेश आहे.
हे उमेदवार केवळ राजकीय आधारावर नव्हे, तर सहकार चळवळीत योगदान देणाऱ्या नेतृत्वासाठी ओळखले जातात. त्यांच्या पाठीमागे माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे, आमदार राजू कारेमोरे आणि नाना पंचबुधे यांचंही मजबूत पाठबळ आहे. परिणामी, हे पॅनल केवळ एक निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे, तर जिल्ह्याच्या सहकार संस्थांना खऱ्या अर्थाने सक्षम बनवण्यासाठी सज्ज झालं आहे.
काँग्रेसचं गणित बिघडलं
दूसरीकडे, काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासाठी ही परिस्थिती निश्चितच धक्का देणारी ठरली आहे. कारण भोंडेकरांच्या पाठिंब्याच्या आशेवर काँग्रेसची गणितं आखली जात होती. मात्र, त्यांच्या पुनरागमनाने काँग्रेसचं गोट अधिक सैल झाल्याची चर्चा आहे. राजकारणात भूमिका बदलतात, परंतु ज्या निर्णयांमागे जिल्ह्याचा, सहकाराचा आणि सामान्य लोकांच्या हिताचा विचार असतो, त्यांचं स्वागत कायमच होतं. भोंडेकरांचं हे ‘परतीचं पाऊल’ म्हणजे संयमित नेतृत्व आणि सहकारप्रेमाच्या एका यशस्वी संवादाचं उदाहरण आहे. महायुतीत पुन्हा एकदा भोंडेकरांसारखा अनुभवसंपन्न नेतृत्व सामील झाल्याने आगामी निवडणुकीत नवचैतन्याचा झरा वाहणार, हे नक्की.