19 जून रोजी शिवसेना शिंदे गट आपला एकोणीसावा वर्धापन दिन साजरा करणार असतानाच, या सोहळ्यात मोठ्या संघटनात्मक फेरबदलांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीचा बिगुल वाजला आहे. राज्यभर निवडणूक सदृश वातावरण तयार होत असतानाच राजकीय पक्षांची धावपळही वाढली आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या शिंदे गटाचा एकोणीसावा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा होणार असल्याची घोषणा झाली आहे.यंदा 19 जूनला होणाऱ्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून संघटनात्मक फेरबदलांची तयारी सुरू आहे. मात्र, या बदलांची माहिती अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहे.
अकोल्यातील अंतर्गत वाद, नागपूर जिल्ह्यातील निर्णय टाळले जाणं आणि जिल्हाध्यक्ष निवडीसाठी होणारे राजकीय गुणाकार यामुळे एकंदरीतच शिवसेना शिंदे गटात वाऱ्याचा जोर प्रचंड वाढलेला आहे.पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये एकनाथ शिंदे यांनी फेरबदलांच्या अनुषंगाने आढावा घेतला. मात्र, नागपूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष निवडीचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. 17 जून रोजी नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र, बैठकीत कोणत्याही नावावर एकमत न झाल्यामुळे निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.
नागपूरवर सगळ्यांची नजर
रेस मध्ये अनेकांचे नाव आघाडीवर आहे. तर इतर काही नावांवरही चर्चा झाली होती. मात्र आमदार कृपाल तुमाने यांनी काही नावांवर नाराजी व्यक्त केल्यानंतर पक्षनेतृत्वाने सर्वांना खूश ठेवण्यासाठी एक नवा फॉर्म्युला मांडला आहे. कार्यकर्त्यांच्या पसंतीवर आधारित जिल्हाध्यक्षाची निवड.शिवसेनेने आता नागपूर जिल्ह्यात सर्वेक्षणाचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांच्या मतानुसार ज्याचं नाव सर्वाधिक वेळा घेतलं जाईल, त्या व्यक्तीच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घातली जाणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी पुढील दोन आठवडे शिंदे गटामध्ये चढाओढीचे वातावरण राहणार आहे.
संपूर्ण प्रक्रियेमध्ये एकनाथ शिंदे हे आमदार कृपाल तुमाने, मंत्री आशिष जयस्वाल आणि स्थानिक नेते किरण पांडव यांची मतं गांभीर्याने विचारात घेणार आहेत. त्यामुळे ‘शिवसेना शिंदे गटाचा जिल्हाध्यक्ष कोण?’ या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत नागपूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेलं राहणार, हे नक्की.19 जूनच्या वर्धापन दिनाआधी अनेक जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक फेरबदलांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नागपूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात अद्यापही अनिश्चिततेचं वातावरण आहे. यामुळे सध्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्सुकतेचा सूर आहे.
एकूणच, आगामी निवडणुकींपूर्वी संघटन मजबूत करण्यासाठी शिंदे गट सज्ज झाला असला, तरी अंतर्गत एकमताचा अभाव ही मोठी अडचण ठरत आहे. त्यामुळे पुढील आठवडे शिवसेनेच्या शिंदे गटासाठी निर्णायक ठरणार आहे.
Indigo Airlines : बॉम्बच्या सावटाखालील विमान आकाशातून नागपूरच्या जमिनीवर
